विठ्ठल पाटील यांनी सुसाईड नोटमध्ये मुलाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. शिवाय मुलाचा मृतदेह कुठे आहे, याची माहिती त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवली. मुलगा दारु पिऊन छळ करतो, याच कारणातून आपण मुलाला संपवलं आहे, असंही त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवलं आहे. रीलस्टार मुलाची हत्या करून वडिलांनी अशाप्रकारे आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
advertisement
माजी सैनिक असलेले विठ्ठल पाटील हे मुळचे एरंडोल तालुक्यातील भवरखेड येथील रहिवासी आहेत. मात्र ते मागील काही वर्षांपासून एरंडोल येथील वृंदावन नगर परिसरात कुटुंबासह वास्तव्याला होते. त्यांचा मुलगा हितेश हा रीलस्टार होता. तो सोशल मीडियावर विविध विषयांवर रील्स बनवायचा. तो वडिलांपासून वेगळं राहायचा. त्याला दारुचं व्यसन होतं. दारु प्यायल्यानंतर अनेकदा तो आपल्या वडिलांच्या घरी जायचा आणि त्यांना मारहाण करायचा.
याच कारणातून वडिलांनी हितेशची हत्या केली. हत्येनंतर हितेशचा मृतदेह भवरखेडा येथील एका नाल्याजवळ पुरला. याची माहिती सुसाईड नोटमध्ये लिहिली होती. पोलिसांनी गुरुवारी घटनास्थळी जाऊन तपास केला असता हितेशचा मृतदेह आढळला आहे. यावेळी पोलिसांना घटनास्थळी एक सुती दोरी देखील आढळली आहे. याच दोरीने विठ्ठल यांनी आपल्या मुलाचा गळा आवळला असावा, असा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
