वाल्मीक कराड शिक्षा भोगत असलेल्या बीड जिल्हा कारागृहात एका आरोपीजवळ गांजा सापडला आहे. त्यामुळे कारागृहात गांजा तस्करी कोण करतंय? याबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे. बीड जिल्हा कारागृहात एका न्यायालयीन बंदीकडून गांजासदृश पदार्थ जप्त करण्यात आला आहे. दोन शासकीय पंचांसमक्ष कारागृहात जप्ती पंचनामा करून त्या बंद्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
या अगोदर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीं वाल्मीक कराड याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याच्या आरोपावरून कारागृह चर्चेत आले होते. आता चक्क कारागृहामध्ये गांजा सापडल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा कारागृहातील सुभेदार बलभीम चिचाणे आणि पोलीस हवालदार अब्दुल वाजेद अब्दुल अजिज हे दोघे कर्तव्यावर असताना. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास बराक क्रमांक ७ मधील न्यायालयीन कोठडीत असलेला बंदी अक्षय ऊर्फ चिंटू मिठ्ठ गायकवाड हा संशयितरीत्या वागत होता.
अक्षय गायकवाडची झडती घेतली असता त्याच्या अंडरविअरमध्ये एक रबरी फिकट आकाशी रंगाचा चिरलेला बॉल होता. त्यामध्ये गांजासदृश्य पदार्थ आढळला आहे. तसेच त्याच्या पॅन्टच्या खिशातील पुडीमध्ये हिरवट रंगाचा पाला, बारीक भुरकट, हिरवट रंगाचे फूल, बिया बोंडे, काड्या असा मुद्देमाल मिळाला. हा मुद्देमाल जप्त करून अक्षय गायकवाड विरुद्ध शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
