मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण पूर्व जोधपूर पोलीस आयुक्तालयाच्या सदर कोतवाली परिसरातील आहे. येथे राहणारा रवींद्र चावरिया यांचा मुलगा दयाशंकर उर्फ बिट्टू हा शहरातील कुख्यात गुन्हेगार आहे. तो गेल्या चार महिन्यांपासून फरार होता. त्याच्यावर हल्ला, दरोडा आणि धमकी यासारखे सुमारे १३ गुन्हे दाखल आहेत. दयाशंकरला पोलिसांनी हिस्ट्रीशीटर घोषित केलं होतं.
अलीकडेच पोलिसांना माहिती मिळाली की, तो स्वत:च्या घरात महिलेच्या वेशात लपून बसला आहे. या माहितीनुसार, डीसीपी आलोक श्रीवास्तव यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी घरावर छापा टाकला, तेव्हा दयाशंकर साडी-ब्लाउज घातलेल्या अवस्थेत आढळला. यादरम्यान त्याने हातवारे करून दयाशंकर घरी नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. संशय वाढताच पोलिसांनी महिलेला थांबवले आणि सखोल चौकशी केली. यावेळी ती महिला नसून फरार हिस्ट्रीशीटर दयाशंकर असल्याचे उघड झाले.
advertisement
पोलिसांनी वारंवार घरी जाऊन त्याचा शोध घेतला, परंतु महिलेच्या कपड्यात बसलेला दयाशंकर हातांनी इशारा करत होता की दयाशंकर घरी नाही. मात्र खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून टीमने पुन्हा चौकशी केली असता महिलेच्या कपड्यात लहान केस असलेला तो पुरूष हिस्ट्रीशीटर दयाशंकर असल्याचं समोर आलं.
खरं तर, दयाशंकर १५ फेब्रुवारी २०२५ रोजी दाखल झालेल्या मारहाण आणि धमकीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी आहे. २३ वर्षीय पीडित प्रिन्स चावला याने तक्रारीत म्हटले होते की, जुन्या वैमनस्यातून दयाशंकर आणि त्याच्या साथीदारांनी रात्री साडेअकराच्या सुमारास काचेच्या बाटल्या, काठ्या, बुक्क्या आणि चापटांनी त्याला बेदम मारहाण केली. तसेच गुन्हा नोंदवू नये अशी धमकी दिली. याच प्रकरणात पोलीस दयाशंकरचा शोध घेत होते. पण आरोपी अत्यंत चलाखीने महिला असल्याचे भासवून पोलिसांना चकमा देत राहिला. परंतु याबाबतची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसामनी त्याला अटक केली. पोलीस आता आरोपीची चौकशी करत आहेत. त्याच्या साथीदारांचा शोधही सुरू आहे. दयाशंकरच्या अटकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.