Navratri 2025: नवरात्रीमुळे पुण्यातील बुरुड आळी गजबजली, घट स्थापनेसाठी लागणाऱ्या परड्यांच्या कामाला वेग

Last Updated:

Navratri 2025: नवरात्रौत्सवात घट बसवण्यासाठी बांबूच्या परडीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. पुण्यातील बुरुड आळीमधील कारागीर या परड्या तयार करतात.

+
Navratri

Navratri 2025: नवरात्रीमुळे पुण्यातील बुरुड आळी गजबजली, घट स्थापनेसाठी लागणाऱ्या परड्यांच्या कामाला वेग

पुणे : नवरात्रीची उत्सवाची चाहूल लागताच पुण्यातील ऐतिहासिक बुरुड आळी पुन्हा एकदा गजबजून गेली आहे. बांबूपासून विविध वस्तू तयार करण्यासाठी ओळखली जाणारी ही आळी सध्या परड्यांच्या कामात रमली आहे. नवरात्रौत्सवात घट बसवण्यासाठी परडीला मोठ्या प्रमाणात मागणी असते, त्यामुळे कारागिरांची दिवस-रात्र लगबग सुरू आहे.
बुरुड आळीतील कारागीर गेल्या अनेक दशकांपासून ही परंपरा जपत आहेत. या आळीतला व्यवसाय सुमारे 140 वर्ष जुना असून सध्या सुमारे 25 कारागीर येथे कार्यरत आहेत. परडी तयार करण्यासाठी लागणारा बांबू प्रामुख्याने कोकणातून मागवला जातो. या बांबूच्या पट्ट्या करून, सोलून व कोरून त्याची नाजूक पण मजबूत रचना तयार केली जाते. व्यावसायिक जनार्दन मोरे सांगतात, बांबूच्या 18 जातींपैकी 'चिवली बांबू' हा परडी बनवण्यासाठी सर्वात योग्य मानला जातो. त्याचा टिकाऊपणा आणि लवचिकता यामुळे परडी मजबूत आणि आकर्षक होते.
advertisement
बुरुड आळीत सध्या घरगुती व देवळात वापरण्यासाठी विविध आकारांच्या परड्या तयार होत आहेत. घरगुती परडी 6 ते 12 इंच आकारात उपलब्ध आहे. मंदिरांसाठी वापरण्यात येणाऱ्या परड्या 18 ते 21 इंच आकारात तयार केल्या जातात. परड्यांची किंमत 40 रुपयांपासून सुरू होते. नवरात्रीच्या काळात या परड्यांना विशेष मागणी असते. अनेक भक्त घरगुती घट स्थापनेसाठी लहान परडी घेतात, तर मंदिर समित्या आणि मोठ्या मंडळांकडून मोठ्या परड्यांची मागणी केली जाते.
advertisement
"गणपती उत्सव संपताच कारागीर परडी बनवण्याच्या कामाला लागतात. प्रत्येक कारागीर दिवसाला 8 ते 10 परड्या तयार करतो. परडी तयार करण्याची प्रक्रिया वेळखाऊ असली तरी कारागीरांचा उत्साह कमी होत नाही. प्रत्येक परडी बनवताना त्याचा आकार, मजबुती आणि गुळगुळीतपणा याकडे बारकाईने लक्ष द्यावे लागते. हे फक्त काम नसून आमच्यासाठी कला आहे," अशी प्रतिक्रिया एका कारागीराने दिली.
advertisement
आजच्या यांत्रिक युगात मशीनमेड वस्तू सहज मिळतात. मात्र, बुरुड आळीतील कारागीर अजूनही हातानेच परडी तयार करतात. त्यामुळे या परड्यांना पारंपरिक व नैसर्गिक सौंदर्य लाभते. बांबूपासून बनवलेली परडी केवळ पर्यावरणपूरक नसून टिकाऊ देखील आहे. नवरात्र जवळ येताच ग्राहकही बुरुड आळीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. परड्यांशिवाय देवीची पूजा पूर्ण होत नाही, अशी अनेक भक्तांची भावना आहे. त्यामुळे प्रत्येक घराघरात परडी पोहोचवण्यासाठी कारागीर काम करत असतात.
advertisement
बुरुड आळी ही केवळ व्यवसायाचं ठिकाण नसून पुण्याची एक सांस्कृतिक परंपरा आहे. नवरात्रीतील घट स्थापनेसाठी परडी घेण्यासाठी लोक वर्षानुवर्षे इथेच येतात. या कारागिरांची मेहनत, बांबूचा सुगंध आणि परंपरेशी असलेलं नातं, यामुळे बुरुड आळीचं अस्तित्व आजही टिकून आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Navratri 2025: नवरात्रीमुळे पुण्यातील बुरुड आळी गजबजली, घट स्थापनेसाठी लागणाऱ्या परड्यांच्या कामाला वेग
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement