मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचं एक पथक महाराष्ट्र-मध्य प्रदेशच्या सीमेवरील असलेल्या उमर्टी गावातील कुख्यात अवैध शस्त्र माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलं होतं. मात्र शस्त्र माफियांनी थेट पोलिसांवर हल्ला करत एका पोलीस कर्मचाऱ्यांचं अपहरण केलं.
चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचं पथक उमर्टी गावात आरोपीला पकडण्यासाठी गेलं असता, आरोपींनी पोलिसांना गुन्हेगारांनी घेरले आणि हवेत गोळीबार केला. पोलिसांनी देखील प्रत्युत्तर म्हणून हवेत गोळीबार केला. पण गुन्हेगारांनी पोलिसांना घेरल्याने ते काहीच करू शकले नाहीत. यात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. यावेळी आरोपींनी पोलीस कर्मचारी शशिकांत पारधी यांचं अपहरण केलं. त्यांना तब्बल चार तास ओलीस ठेवलं होतं.
advertisement
या घटनेची अधिक माहिती देताना जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितलं की, "आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याची आम्ही गांभीर्याने दखल घेतली आहे. मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने आमच्या सहकाऱ्याची सुटका केली आहे. दोषी आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल."
आरोपींवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकातील एका जखमी पोलीस कर्मचाऱ्याने सांगितलं की, आम्ही चोपडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमर्टी गावात कारवाईसाठी गेले होतो. आम्ही एका आरोपीला पकडलं होतं. मात्र यानंतर तिथल्या लोकांनी आम्हाला मारहाण करायला सुरुवात केली. यानंतर त्यांनी आमच्या पथकातील एका पोलीस कर्मचाऱ्याचं अपहरण केलं. त्यांना मध्य प्रदेशात घेऊन जात ओलीस ठेवलं. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने संबंधित पोलिसाची सुटका केली आहे. जवळपास चार तासांच्या नाट्यानंतर पोलिसाची सुटका झाली आहे. पण अशाप्रकारे गुन्हेगारांनी पोलिसाचं अपहरण केल्यानं पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.
