लखन अण्णासाहेब बेनाडे असं हत्या झालेल्या 35 वर्षीय ग्रामपंचायत सदस्याचं नाव आहे. मागील आठ दिवसांपासून ते बेपत्ता होते. आता कर्नाटकच्या हद्दीत भयावह अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. मारेकर्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे दोन तुकडे केले. तसेच अर्धवट जाळलेल्या अवस्थेत मृतदेह संकेश्वरनजीक असलेल्या हिरण्यकेशी नदीत फेकून दिला होता. पाच ते सहा दिवसांपूर्वी त्यांची हत्या झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
advertisement
याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पाच संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे रांगोळी आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बेनाडे बेपत्ता असल्याची फिर्याद त्यांची बहीण नीता उमाजी तडाखे यांनी गुरुवारी 10 जुलैला गावभाग पोलीस ठाण्यात दिली होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लखन बेनाडे यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात सातत्याने खटके उडत होते. त्यांच्यातील वादाचे व्हिडीओ यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे या हत्याकांडात संबंधित महिलेचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी बेनाडे यांनी सासरवाडीकडून छळ होत असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. त्यामुळे बेनाडे यांच्या हत्येचा सस्पेन्स वाढला आहे. पण एका ग्रामपंचायत सदस्याची अशाप्रकारे हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.