समीक्षाची हत्या केल्यानंतर सतीशने मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास आपल्या एका मित्राला फोन केला. आपण समीक्षाची हत्या करणार आणि स्वत:ही आत्महत्या करणार, अशी माहिती त्याने दिली. यानंतर अवघ्या अर्ध्या तासात आरोपीनं प्रेयसीचा खून केला आणि घटनास्थळावरून फरार झाला. बुधवारी (४ जून) सकाळी त्याने शाहूवाडी तालुक्यातील कातळेवाडी बांद्रेवाडीत धरणाजवळ झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या जोडप्याचा अशाप्रकारे रक्तरंजित शेवट झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीक्षा नरसिंगे आणि सतीश यादव मागील चार महिन्यांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. समीक्षाचं आधीच लग्न झालं होतं. लग्नानंतर तिची सतीशची जवळीक वाढली. यानंतर सतीशने समीक्षाकडे लग्नाचा तगादा लावला. पण तिने लग्नास नकार दिला. शिवाय ती फ्लॅट सोडून निघूनही गेली. याचा राग मनात धरून सतीशने समीक्षाची हत्या केली. पण समीक्षाचा खून करण्यापूर्वी हल्लेखोर सतीश यादव मंगळवारी मोबाइलवरून मित्रांच्या संपर्कात होता.
आधी प्लॅन केला मग थंड डोक्याने मर्डर
त्या दिवशी सकाळपासूनच तो दारूच्या नशेत होता. दुपारी दोनच्या सुमारास त्याने त्याचा मित्र प्रकाश सुळेकर याला फोन केला होता. फोनवरून त्याने समीक्षाचा खून करून स्वतः देखील आत्महत्या करणार असल्याचे सांगितलं. त्यानुसार अर्ध्या तासातच त्याने सरनोबतवाडी येथील भाड्याच्या घरामध्ये समीक्षाचा तिच्या मैत्रीणीच्या डोळ्यादेखत चाकूने भोसकून खून केला. समीक्षा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असताना सतीशने दोघींना घरात कोंडून दुचाकीवरून फरार झाला.
पळून जाण्यासाठी मित्राकडून २०० रुपये घेतले
कोल्हापुरातून तो बाजार भोगाव या ठिकाणी गेला. तिथे त्याने एका मित्राकडून 200 रुपये घेतले. दुचाकीत पेट्रोल टाकून तो रात्री शाहूवाडी तालुक्यातील नांदारी येथील मित्र अरुण सुतार याच्या घरी गेला. बुधवारी सकाळी घरातले कोणी उठण्यापूर्वीच तो दुचाकी घेऊन घरातून निघून गेला. त्यानंतर काही वेळाने पोलिसांचं एक पथक नांदारीत सुतार याच्या घरी सतीशचा शोध घेण्यासाठी पोहोचले होते. त्यांनी अरुण सुतार याला सोबत घेऊन दिवसभर सतीश यादवचा शोध घेतला. मात्र, तो कुठेही सापडला नाही. अखेर गुरुवारी सकाळी तो गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. परिसरातील काही शेतकऱ्यांनी सतीशला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिलं.