आदमगौस पठाण असं ४२ वर्षीय संशयित आरोपीचं नाव आहे. तो हातकणंगले तालुक्यातील घुणकी येथील रहिवासी आहे. घटनेच्या दिवशी त्याने एका सुमन सरगर नावाच्या महिलेला अतिग्रे येथील हॉटेल सागरिका येथे बोलवलं होतं. याठिकाणी पठाणे लोखंडी हातोडी डोक्यात घालून सुमनची हत्या केली आहे. ज्या हॉटेलमध्ये हे हत्याकांड घडलं ते हॉटेल कोल्हापूर-सांगली महामार्गावर आहे.
advertisement
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी सायंकाळी आरोपी आदम गौस पठाण आणि सुमन सरगर हे लॉजिंगमध्ये आले होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. यातून दोघांमध्ये काही पैशांची देवाणघेवाण झाली होती. हेच पैसे पठाण सुमनकडे मागत होता. मात्र सुमन पैसे देत नव्हती. त्यामुळे संतापलेल्या पठाणने तिला लॉजवर भेटायला बोलावले. तिथे त्याने सुमनच्या डोक्यात हातोडीचे तीन घाव घालून तिची निर्घृण हत्या केली. हत्येची घटना घडल्यानंतर पठाणने एक चिठ्ठी लिहून विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हॉटेल कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी त्याला रोखले आणि पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पठाण आणि सुमन यांची ओळख एका कार्यक्रमात झाली होती. नंतर या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. याच संबंधाचा फायदा घेऊन सुमन सरगरने पठाणकडून सात लाख रुपये घेतले होते. याबाबतची तक्रार पठाणने हत्या केल्यानंतर पोलीस ठाण्यात केली आहे. ही रक्कम परत मिळत नसल्याने आपण सुमनची हत्या करण्याचा कट रचला, अशी माहिती आरोपीनं दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत पठाणला बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे पठाणने काही वर्षांपूर्वी आपल्या पहिल्या पत्नीचाही खून केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याप्रकरणी पठाणवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशात आता त्याने प्रेयसीचा निर्घृण खून केला आहे. घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
