सिवनी, 31 ऑगस्ट : नवरा-बायकोच्या नात्यात लहान-मोठे खटके उडतच असतात. त्यातून सामंजस्याने मार्ग काढायचा असतो, मात्र काहीजणांच्या चढलेल्या पाऱ्यापुढे कोणाचं काहीच चालत नाही. अशाच एका नवऱ्याची अत्यंत विकृत कृती समोर आली आहे. बायकोसोबत भांडण झालं म्हणून त्याने जे काही केलं, त्याने संपूर्ण परिसर सुन्न झाला.
बायकोसोबत झालेल्या घरगुती भांडणांमुळे हा नवरा थेट सासरवाडीत पोहोचला आणि त्याने तिथे अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात त्याची आत्येसासू सुलोचना बघेल आणि मेहुणा जयदीप बघेल हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांनाही गोळ्या लागल्या. तर, बंदुकीच्या आवाजाने संपूर्ण लोनिया गाव हादरलं. मध्यप्रदेशच्या सिवनी जिल्ह्यात हे गाव आहे. दरम्यान, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दोन्ही जखमींना नागपूरला हलवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
advertisement
विशेष म्हणजे आरोपी जावई विशाल बघेल हा एसएफ दलात सामील आहे. सध्या तो बालाघाट जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक निवासात स्वयंपाकी म्हणून काम करत होता. तर त्याची पत्नीदेखील पोलीस हवालदार आहे. दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. यावरून आरोपीने एकदा सासरवाडीत जाऊन भांडण केलं, सासऱ्यांना मारहाणही केली. याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही हा विकृत जावई शांत बसला नाही. बुधवारी रात्री तो पुन्हा सासरवाडीत गेला आणि त्याने अंदाधुंद गोळीबार केला. सध्या तो फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
