समीक्षा भरत नरसिंगे (२३, रा. दत्त मंदिर, जय भवानी गल्ली, कसबा बावडा) असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे. तर सतीश यादव (रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) असे हल्लेखोर तरुणाचे नाव आहे. आरोपी तरुणाने मयत तरुणीकडे लग्नाची मागणी घातली होती. पण तरुणीने लग्नाला नकार दिला. याच रागातून आरोपीनं हे भयावह कृत्य केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, मयत तरुणी आणि आरोपी दोघंही कोल्हापुरचे रहिवासी आहेत. ५ महिन्यांपूर्वी दोघांनी अन्य एका मैत्रिणीला सोबत घेत एक इव्हेंट कंपनी सुरू केली होती. तिघेही एकत्र राहत होते. पण गेल्या दोन महिन्यांपासून काम नसल्याने त्यांना घरभाडे देणेही अवघड झाले होते. दरम्यान, सतीश यादव याने तरुणीला लग्नाची मागणी घातली होती. पण तरुणीने लग्नाला नकार दिला होता. चार दिवसांपूर्वी सतीश आणि समीक्षामध्येही वाद झाला होता. या वादानंतर समीक्षा व दुसरी मैत्रीण फ्लॅट सोडून गेली.
दरम्यान, मंगळवारी दोघी फ्लॅटवरील आपलं साहित्य घेऊन जाण्यासाठी फ्लॅटवर आल्या. यावेळी सतीशने समीक्षाशी वाद घातला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर सतीशने चाकूने भोसकून समीक्षाचा खून केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने फ्लॅटला बाहेरून कडी लावून पसार झाला. सतीशने समीक्षावर एकच वार केला होता. पण तो इतका तीव्र होता की चाकू समीक्षाच्या बरगडीतच अडकला. आरोपीनं बाहेरून कडी लावल्याने समीक्षाचा मैत्रीणीच्या डोळ्यादेखत तडफडून मृत्यू झाला. हा प्रकार घडल्यानंतर समीक्षाच्या मैत्रिणीने तातडीने या घटनेची माहिती अन्य एका मित्राला आणि समीक्षाच्या बहिणीला दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
