आता या प्रकरणातील आरोपी सावकार आणि स्थानिक भाजप नेता लक्ष्मण जाधव आणि मयत राम फटाले यांच्या संभाषणाच्या दोन अतिशय धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्या आहेत. या कॉल रेकॉर्डिंगमध्ये सावकार लक्ष्मण जाधव हा फटाले यांना अरेरावीची भाषा करत शिवीगाळ करताना ऐकू येत आहे. तू माझ्या हॉस्पिटलमध्ये तुझ्या वडिलांना घेऊन ये, तसेच माझी मुद्दल मला परत दे.. कधी देतोस ते सांग? तू नाही आलास तर मला तुझ्या घरी पोरं घेऊन यावं लागेल, अशा प्रकारची धमकी आरोपी देताना दिसत आहे.
advertisement
तर दुसऱ्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये 2000 रूपये टाकले, वरचे चारशे रुपये तुझा बाप टाकणार आहे का ?.. अशा प्रकारची भाषा सावकार जाधव वापरत असल्याचं या कॉल रेकॉर्डिंगमधून समोर आलं आहे. तुला पैसे देणं होत नसेल तर तुझी बायको माझ्या घरी आणून सोड, अशा प्रकारची भाषा वापरल्याचा देखील फिर्यादीमध्ये म्हटलं आहे.
लक्ष्मण जाधवकडून सातत्याने अशा प्रकारच्या होत असलेल्या जाचाला कंटाळूनच राम फटालेंनी आत्महत्या केल्याचं आता स्पष्ट होत आहे. यामुळे बीड शहरातील हे प्रकरण अतिशय गंभीर बनलं असून सावकारावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत फटाले यांनी सात वर्षांपूर्वी आरोपी जाधव याच्याकडून १० टक्के व्याजदराने आरोपीकडून अडीच लाख रुपये घेतले होते. याच पैशांसाठी आरोपी फटाले यांचा छळ करत होता. सावकाराच्या छळाला कंटाळून अखेर फटाले यांनी टोकाचं पाऊल उचललं. यावेळी त्यांनी लिहिलेल्या चार पानी चिठ्ठीत मृत्यूस जबाबदार असलेल्यांची नावं लिहिली आहेत.
