13 जानेवारी रोजी जामडीच्या वन परिसरात राजू पवार यांचा निर्वस्त्र व गंभीर जखमी अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. राजू पवार हे स्थानिक राजकारणात सक्रिय होते. त्यांचे वडील माजी सरपंच, तर काकू रेणुका पवार या विद्यमान सरपंच असल्याने ही हत्या अधिकच चर्चेत आली होती. राजकारणासोबतच शासकीय कामांची कंत्राटे घेणारा व्यक्ती अशा प्रकारे मृत आढळल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.
advertisement
पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आणि अपर पोलीस अधीक्षक अण्णपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि कन्नड ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला. सलग सहा दिवस चाललेल्या तपासात 71 गावकऱ्यांची चौकशी करण्यात आली. यामधून राजू पवार यांच्याशी वाद असलेल्या 9 जणांची नावे पुढे आली. त्यामध्ये वंदना पवार आणि तिचा मुलगा धीरज यांचाही समावेश होता.
दोघांची स्वतंत्र चौकशी केली असता, ते सहा दिवस अत्यंत संयमाने उत्तरे देत होते. मात्र धीरजच्या मोबाईलमध्ये वंदनाचा मोबाईल पाण्यात पडल्याचा फोटो आढळून आला. या फोटोबाबत विचारणा केल्यावर आई-मुलाच्या उत्तरात विसंगती दिसून आली. पोलिसांनी अधिक कडक चौकशी करताच वंदनाचा संयम सुटला आणि तिने राजू पवारकडून अनेक वर्षांपासून होत असलेल्या छळाची माहिती दिली.
छळाला कंटाळून केला प्लॅन
वंदनाने दिलेल्या जबाबानुसार, राजू पवार याची तिच्यावर अनेक वर्षांपासून वाईट नजर होती. तो सतत शारीरिक संबंधासाठी दबाव टाकत होता. मोबाईलवर ब्लॉक केल्यानंतरही तो गावात अडवून त्रास देत होता. या छळाला कंटाळून तिने मुलासोबत हत्येचा कट रचल्याचे कबूल केले. 13 जानेवारी रोजी राजूने पुन्हा जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी धीरज तेथे पोहोचला. संतप्त झालेल्या धीरजने राजूचे गुप्तांग कापले, त्यानंतर डोके ठेचून त्याची हत्या करण्यात आली.
चित्रपट पाहिला अन्...
तपासात असेही उघड झाले की, बी.ए. प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या धीरजने हत्येपूर्वी ‘दृश्यम’ चित्रपट वारंवार पाहिला, तसेच टीव्हीवरील क्राइम थ्रिलर आणि वेबसिरीजमधून गुन्हे कसे केले जातात याचे निरीक्षण केले. इंटरनेटवरून त्याने पुरावे कसे नष्ट करायचे, पोलिस कोणते प्रश्न विचारतात, मोबाईल लोकेशन कसे टाळायचे याचा अभ्यास केला होता. पोलिस चौकशीत गोंधळ होऊ नये म्हणून आईकडून संपूर्ण घटनाक्रम पाठ करून घेतल्याचेही समोर आले आहे.
हत्येनंतर धीरजने वंदनाचा मोबाईल पाण्यात फेकला, सिमकार्ड काढून दुसऱ्या मोबाईलमध्ये वापरले. राजू पवारचा मोबाईल फोडून विरुद्ध दिशेला फेकण्यात आला. मृतदेह जंगलात नेऊन टाकण्यात आला. ठसे मिळू नयेत म्हणून मृताचे कपडे आणि चप्पलही वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आल्या होत्या.
दरम्यान, या संपूर्ण कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा व कन्नड ग्रामीण पोलिसांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली असून पुढील तपास सुरू आहे.






