मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती शहर पोलिसांच्या दामिनी पथकाने शहरातील तीन कॅफेसह छत्री तलावलगत असलेल्या निर्जनस्थळी धाडी टाकून १३ युवक-युवतींना ताब्यात घेतलं. त्यांच्याविरूद्ध कारवाई करून पोलिसांनी मुलींना त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिलं. त्यामुळे शहरातील कॅफे चालकात चांगलीच खळबळ उडाली आहे.
एका तासाला २०० रुपये
या कॅफेमध्ये युवक-युवतींना बसण्यासाठी एका तासाला 200 रुपये आकारले जात होते. जोडप्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात होती. कॅफेच्या आड आंबट शौकीनांचा अड्डा चालविणाऱ्या काही कॅफेवर शहर पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी धडक कारवाई केली होती. या कारवाईत काही कॅफेला टाळे ठोकले होते. परंतु कारवाई थांबल्यामुळे पुन्हा काही कॅफेत युवक-युवतींचे अश्लील चाळे सुरू झाले. तसेच काही कॅफे चालक जोडप्यांना तासाप्रमाणे कॅबिन उपलब्ध करून देतात. इथं कॅबिनमध्ये लाईट बंद करून जोडपे तासन्तास बसतात. दरम्यान, त्यांना काही ऑर्डरसुद्धा द्यावी लागते, अशी माहिती आयुक्तालयातील भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक दीप्ती ब्राम्हणे यांना मिळाली होती.
advertisement
या माहितीच्या आधारे त्यांनी दामिनी पथकाच्या मदतीने राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील बर्गर लॅन्ड, फ्युजन बाईट, कॅफे आणि छत्री तलाव परिसरातील निर्जनस्थळी धाडी घातल्या. या कारवाईत दामिनी पथकाला १३ युवक-युवती नको त्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी या सर्वांना पोलीस ठाण्यात आणलं. त्यांची कसून चौकशी केली आणि ओळखपत्र घेऊन नोंद घेतली. तसेच युवतींच्या आई-वडिलांना बोलावून मुलींना त्यांच्या ताब्यात दिले. या कारवाईमुळे शहरातील कॅफे चालकात चांगलीच खळबळ उडाली आहे.
