12 वीच्या विद्यार्थीनीची गळा चिरुन हत्या
आश्रम शाळेतून महाविद्यालयात चालत जाणाऱ्या विद्यार्थीनीवर रस्त्यातच कोयत्याने वार करत गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना मोखाडा येथे समोर आली आहे. मोखाड्यातील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात बारावीत विज्ञान शाखेत शिकणाऱ्या अर्चना उदर या विद्यार्थिनीवर हा जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला आहे. अर्चना ही बारावीत शिक्षण घेत असून महाविद्यालय ते आश्रम शाळा अशा पाचशे मीटरचा रस्ता पायी जात असताना अर्चनावर हा हल्ला करण्यात आला. अर्चना सोबत असलेल्या तिच्या मैत्रिणींनी आरडाओरड सुरू केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला असून मोखाडा पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृत मुलीचे आरोपीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, तिचे दुसऱ्या ठिकाणी लग्न जमलं होतं. यातून तिची हत्या झाल्याची माहिती आता समोर आली आहे. प्रभाकर वाघिरे, असं आरोपीचं नाव आहे.
advertisement
या घटनेनंतर मोखाडा पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून या घटनेनंतर आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालघर सारख्या ग्रामीण भागात असणाऱ्या आश्रम शाळांमधील व्यवस्थापनाचा उडालेला बोजवारा नेहमीच उघडकीस होतो. मात्र, विद्यार्थिनीच्या झालेल्या या हत्येनंतर आश्रम शाळांमधील विद्यार्थिनी भीतीच्या छायेखाली आहेत.
नागपुरात कॉलेजला जाणाऱ्या तरुणीवर बलात्कार
नागपुरात वर्धा रोडवरील निर्जन रस्त्यावर कॉलेजला जाणाऱ्या एका तरुणीवर अत्याचार झाला. मुख्य रस्त्यावरून झाडी झुडूपांच्या निर्जन रस्त्यावरून महाविद्यालयाकडे जात असताना ही घटना घडली. अज्ञात आरोपीने कुऱ्हाडीचा धाक दाखवत पीडित विद्यार्थिनीला झाडी झुडुपात ओढून नेत तिच्यावर बळजबरी केली. बुधवारी दुपारी 11 ते 1 च्या दरम्यान ही घटना घडली. अद्यापपर्यंत आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
वाचा - प्रायव्हेट पार्टवर गोंदवलं नाव, तिघींवर लैंगिक अत्याचार, मुंबईतल्या डॉक्टरला अटक
शॉर्टकट घेणे पडले महागात
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पीडित विद्यार्थिनीला बुधवारी महाविद्यालयात जाण्यासाठी उशीर झाल्यामुळे ती शॉर्टकट रस्ता वापरून महाविद्यालयाकडे जात होती. यावेळी अज्ञात आरोपीने तिचा पाठलाग सुरू केला. त्यावेळेस पीडित तरुणी फोनवर आपल्या कुटुंबीयांसोबत बोलत होती. पीडितीने एक संशयास्पद व्यक्ती माझा पाठलाग करत असल्याचे कुटुंबीयांना सांगितले. मात्र, ती काही करू शकतील याच्या आधीच आरोपीने तिला कुऱ्हाडीचा धाक दाखवत झुडुपात ओढत नेले आणि बलात्कार केला. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिसांचे अनेक पथक त्याचा शोध घेत आहेत.
