अशोक धोडी यांच्या कुटुंबीयांनी अशोक धोडींचे भाऊ अविनाश धोडी हेच अशोक धोडी यांच्या अपहरणाचे मुख्य सूत्रधार असल्याचा दावा केला आहे. तर अविनाश धोडी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर आतापर्यंत 15 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याचा दावा देखील अशोक धोडी यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. अविनाश धोडी यांना लवकरात लवकर अटक करून आमच्या वडिलांना सुखरूप घरी सोडावं असं आवाहन करतानाच अशोक धोडी यांचा मुलगा आकाश याने आरोपी अविनाश धोडी यांच्यापासून आमच्या जीवालाही धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे कुटुंबियांच्या या आरोपानंतर अशोक धोंडी यांच्या अपहरणात सख्खा भाऊच मुख्य सुत्रधार असल्याचे स्पष्ट होतं आहे.
advertisement
दरम्यान या प्रकरणात आता आठ पथक विविध ठिकाणी तैनात करून तपास सूरू केला होता. यामध्ये 4 जणांना ताब्यातही घेतल्याची माहिती आहे. तसेच संशयित आरोपी म्हणून घोलवड पोलिसांनी अविनाश धोडी याला चौकशीसाठी बोलावलं होतं. पण घोलवड पोलीस ठाण्याऐवजी पोलीस चौकीवर अविनाश धोडी हा चौकशीसाठी आला होता. पण नंतर अंधाराचा फायदा घेऊन तो फरार झाला होता. त्यानंतर आता घोलवड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेकडून अविनाश धोडीचा शोध सूरू आहे.
सहा पथक आरोपीच्या मागावर
जमीन आणि संपत्तीच्या वादातून अशोक धोडी यांचे अपहरण करून घातपात केल्या असल्याचा संशय पोलिसांना बळावला होता. त्याच पार्श्वभूमीवर पोलीस तपास करत आहेत. पालघर पोलिसाचे 6 वेगवेगळे पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले आहेत. डहाणू,वाणगाव, नागझरी, गुजरातच्या दादरा नगर हवले परिसरात पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. त्यामुळे आज दुपारपर्यंत अशोक धोडी अपहरण प्रकरणाचे सर्व खुलासे होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
