वसई पश्चिमेच्या शास्त्रीनगर येथील किशोर कुंज इमारतीत एका चोरट्याने आत प्रवेश करून घरी एकटेच असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला शौचालयाचा पाईप लिकेज झाल्याचे सांगून शौचालय ढकलून कोंडून ठेवले. याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अज्ञात चोरट्याचा तपास सुरू आहे.
दीड कोटीची चोरी
वसईत शास्त्री नगरच्या किशोर कुंज इमारतीत भानुशाली यांच्या घरी भरदिवसा ढवळ्या दीड कोटीची चोरी करण्यात आली आहे. घरातील महिला रक्षाबंधनसाठी भावाकडे गेल्या होत्या त्यावेळी ज्येष्ठ नागरिक भानुशाली एकटेच घरात होते. हीच संधी साधत अज्ञात चोरट्याने नकली दाढी लावून संवाद साधत घरात प्रवेश मिळवला.
advertisement
घरमालकाला शौचालयात कोंडले
घरात गेल्यानंतर गप्पा मारल्यानंतर वॉशरूम ला जायचे आहे असे सांगून वॉशरूममध्ये गेला. वॉशरुममधून बाहेर आल्यानंतर वॉशरूमचा पाईप लिकेज झाला आहे, असे सांगितले. भानुशाली हे कुठे लिकेज झाले हे पाहण्यासाठी शौचालयात गेले. त्याचवेळी चोरट्याने बाहेरून दरवाजा लावला, घरमालकाला शौचालयात कोंडले. घरमालकाचे आणि त्यांच्य मुलीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन चोरटा पसार झाला आहे.
सतर्क राहण्याचे आवाहन
चोरटे अक्षरशः मोकाट सुटलेत, दिवसाढवळ्या दरोडा पडल्याने एकच खळबळ उडालीय. सर्वसामान्य नागरिकांचे धाबे दणाणले आहेत. सुट्ट्यांमध्ये घरे बंद करून घरमालक हे गावी किंवा बाहेर निघून जातात किंवा कधी कधी घरी फक्त ज्येष्ठ नागरिक किंवा लहान मुले असतात . त्या वेळी बंद घरे, प्लॅट फोडून चोरटे मौल्यवान वस्तू चोरून नेताता. सुट्टीच्या काळात दागिने, पैसे घरात ठेवू नयेत, ते बँकेत ठेवावेत, नातेवाइक, शेजाऱ्यांना घराकडे लक्ष ठेवण्यास सांगावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
