गोव्यात एका बिल्डिंगच्या फ्लॅटमध्ये 30 वर्षांची महिला राहत होती. ती श्रीमंत कुटुंबातली असली आणि वयाने मोठी असली, तरी तिचं तिच्यापेक्षा 8 वर्षांनी लहान असलेल्या एका मेकॅनिकवर प्रेम जडलं. तिने निष्पाप मनाने प्रेम केलं; पण तिच्या नशिबी काही वेगळंच लिहिलेलं होतं.
30 ऑगस्ट रोजी त्या महिलेचे कुटुंबीय तिला सतत कॉल करत होते; मात्र ती फोन उचलतच नव्हती. साहजिकच ते चिंतित झाले. त्यामुळे त्यांनी गोव्यातल्या एका परिचित व्यक्तीला कॉल करून तिच्या घरी जायला सांगितलं. तो तिथे गेल्यावर बराच वेळ डोअरबेल वाजवूनही दरवाजा उघडला गेला नाही. म्हणून त्याने दरवाजाला धक्का मारला, तर दरवाजा लगेचच उघडला. कारण तो आतून बंदच नव्हता. तो माणूस आत गेला आणि त्याने त्या महिलेला हाका मारायला सुरुवात केली; पण त्याला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तेवढ्यात त्याला फरशीवर रक्ताचे डाग दिसले. अखेर त्याने तिच्या कुटुंबीयांना याबद्दल कळवलं.
advertisement
तिचे कुटुंबीय तातडीने गोव्यात येऊन पोलिसांत तक्रार दाखल करतात. पोलिसांनी त्यांच्याकडून महिलेबद्दलची सगळी माहिती जाणून घेतली. त्यांचा कोणावर संशय आहे का, याबद्दलही त्यांनी विचारलं. तेव्हा त्यांनी 22 वर्षांच्या एका तरुणाशी तिची मैत्री असल्याचं सांगितलं. तेवढ्या माहितीवरून पोलिसांनी धागेदोरे जुळवले आणि त्यातून त्यांच्या असं लक्षात आलं, की कामाक्षी नावाच्या या महिलेने गायब होण्याच्या एक दिवसच आधी त्या तरुणाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
प्रकाश नावाचा एक तरुण आपल्याला त्रास देत असल्याचं तिने त्या तक्रारीत म्हटलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्या प्रकाशला ताब्यात घेतलं. त्याच्या चौकशीवेळी त्याने सांगितलं, की कामाक्षीने आपल्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर तिला कधीच भेटायचं नाही असं आपण ठरवलं होतं. पोलिसांचा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. पोलिसांनी त्याचे कॉल रेकॉर्ड तपासले. त्यात असं लक्षात आलं, की त्याने शेवटचा कॉल कामाक्षीलाच केला होता आणि त्याचं लोकेशनही तिच्या घराच्या जवळचंच दिसत होतं. त्यानंतर पोलिसी हिसका दाखवल्यानंतर त्याने सत्य सांगायला सुरुवात केली.
प्रकाशने दिलेल्या माहितीनुसार, तो पेंटर होता आणि मेकॅनिक म्हणूनही काम करायचा. कामाक्षीशी भेट झाल्यानंतर एक वेगळं आकर्षण निर्माण झालं. दोघांच्या गाठीभेटी वाढल्या. दोघं जण रिलेशनशिपमध्ये राहू लागले; मात्र काही काळानंतर तिने त्याच्यापासून अंतर राखायला सुरुवात केली. कारण प्रकाश गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती तिला मिळाली होती; मात्र तेव्हा प्रकाशला तिच्यापासून दूर जायचं नव्हतं. तो तिचा सतत पाठलाग करायचा. अखेर कामाक्षीने पोलिसांत तक्रार दाखल केली.
तक्रारीचं त्याला कळल्यावर तो तिच्या घरी गेला आणि त्याने तिला जाब विचारला. साहजिकच त्यांच्यात भांडणं झाली आणि अखेर प्रकाशने कामाक्षीवर चाकूने अनेक वार केले. तिचा मृतदेह त्याने तिथून उचलून महाराष्ट्राच्या हद्दीत नेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आंबोली घाटाजवळ जमिनीत पुरला.
असा सारा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी प्रकाशला अटक केली आहे. त्याने सांगितलेल्या ठिकाणी खुदाई करून कामाक्षीचा मृतदेह बाहेर काढण्यात येत आहे. निष्पाप मनाने केलेल्या प्रेमाचा असा झालेला अंत सर्वांनाच हेलावून सोडणारा आहे.