राजाच्या हत्याचे प्रकरण समोर आल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त करीत सोनमचे फोटो फाडले. सोनम आधीच कॉफीतून विष देऊन राजाला मारण्याचा प्रयत्न करत होती, असा धक्कादायक दावा राजाच्या आईने केला आहे. राजाच्या मृत्यूची बातमी कळाली तेव्हा आमच्या पायाखालची जमीन सरकली. सोनमने केलेल्या कृत्याची शिक्षा तिला मिळायलाच हवी, अशा संतापजनक भावना राजाच्या कुटुंबियांनी व्यक्त केल्या. मेघालय पोलिसांनी सोनमसह तीन आरोपींना राजाच्या हत्या प्रकरणात अटक केली आहे.
advertisement
सोनमचे लग्नातले फोटो टराटरा फाडले
सोनम लग्नाच्या आधीपासून माझ्याशी चांगले बोलायची. कधी भेटली तर आई आई म्हणत गळ्यात पडायची. लग्नाच्या दरम्यान राजा आणि सोनममध्ये काहीसे बोलणे कमी झाले होते. त्यासाठी मी सोनमच्या आईला 'दोघांना भेटू द्या' अशी विनंती केली होती. मात्र सोनमच्या बाबांना लग्नाआधी भेटलेले आवडणार नाही, असे सांगत त्यांनी नकार दिला. सोनम असे करेन असे आम्हाला कधीही वाटले नाही. आताही वाटत नाही. परंतु पोलीस चौकशीत जर सोनमचा दोष आढळला तर तिला कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे राजाची आई म्हणाली.
दुसरीकडे शिलाँग पोलिसांनी सोनमने सुपारी देऊन राजाची हत्या घडवून आणली, असे सांगितल्यानंतर राजाच्या कुटुंबियांचा संताप अनावर झाला. राजा आणि सोनमच्या लग्नातले फोटो, त्यांनी टराटरा फाडले. सोनम आणि राजाचे लग्न तीन आठवड्यांपूर्वी झाले होते. लग्नातल्या आठवणी अजूनही सगळ्यांच्या डोळ्यासमोरून जात नव्हत्या. परंतु मधुचंद्राला गेलेल्या राजाचा असा शेवट होईल, असे कुणालाही कधी वाटले नाही, असे सांगत राजाच्या कुटुंबियांना रडू कोसळले.
सोनमच्या वडिलांचा वेगळाच दावा
दुसरीकडे सोनमच्या वडिलांनी मात्र तिच्या आधीच्या प्रेमाचे खंडन करीत असे काहीच नसल्याचे म्हटले. मेघालय पोलीस राजाच्या खून प्रकरणात माझ्या मुलीला अडकविण्याचे प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सोनमच्या वडिलांनी केली आहे.