ही घटना जळगावच्या धरणगाव तालुक्यातील सोनवद गावाजवळील विहीर फाटा परिसरात घडली. राहुल सावंत या 26 वर्षीय तरुणाने पंधरा वर्षांपूर्वी आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला म्हणून गोपाल मालचे नावाच्या व्यक्तीची गोळ्या घालून हत्या केली आहे. हत्येची ही घटना समोर येताच धरणगावसह संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राहुलच्या वडिलांचा 2010 मध्ये गावातील वादातून खून झाला होता. या प्रकरणात गोपाल मालचे हा आरोपी होता. त्याने राहुलच्या वडिलांचा खून केल्याचा आरोप होता. मात्र या खटल्यातून गोपाल मालचे याची निर्दोष सुटका झाली होती. कोर्टानं निर्दोष सोडलं असलं तरी राहुलच्या मनात वडिलांच्या खूनाचा बदला घेण्याची आग धगधगत होती.
advertisement
मंगळवारी रात्री साधारण आठच्या सुमारास गोपाल मालचे हे खामखेडे येथून आपल्या परिवारासह वाकटूकी येथे आपल्या घरी परत येत होते. यावेळी राहुलने विहीर फाटा येथे गोपाल मालचे यांच्या कारसमोर आपली बुलेट लावली. रस्त्यावर बुलेट लावलेली पाहून गोपाल मालचे हे कारमधून खाली उतरले. यावेळी राहुलने गोपालच्या कपाळाच्या मधोमध नेम धरत गोळी झाडली. यात गोपाल मालचेचा जागीच मृत्यू झाला.
खून केल्यानंतर राहुल सावंतने घटनास्थळावरून पळ न काढता थेट धरणगाव पोलीस स्टेशन गाठले आणि स्वतःहून पोलिसांकडे सरेंडर केलं. यासंदर्भात धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गावात तणावाचे वातावरण असल्यामुळे पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे.
