ठाणे : पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादातून एका व्यक्तीला चारचाकी गाडीने चिरडून ठार मारल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात घडली आहे. संतोष पवार उर्फ संध्या असे आरोपीचे नाव असून, या घटनेनंतर तो फरार झाला आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी तीन पथके तयार केली असून, या घटनेचा थरार व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
advertisement
समोर आलेल्या माहितीनुसार, संतोष पवार आणि विठ्ठल गायकवाड यांच्यात जुना वाद होता. याच वादातून आरोपी संतोष पवारने काल रात्री नऊच्या सुमारास गायकवाड यांना आपल्या गाडीखाली चिरडले. हा सर्व थरार परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, पवारने आपल्या कारने गायकवाड यांना अक्षरशः चिरडले आहे. या हल्ल्यात विठ्ठल गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला.
आरोपी फरार, पोलीस तपास सुरू
या घटनेनंतर आरोपी संतोष पवार घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याचा शोध सुरू केला आहे. आरोपीला लवकरात लवकर पकडण्यासाठी श्रीनगर पोलिसांनी तीन स्वतंत्र पथके तयार केली आहेत. तसेच, पोलिसांनी संतोष पवारच्या जवळच्या एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेत वापरलेली चारचाकी गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.
परिसरात भितीचे वातावरण
ही घटना घडल्यानंतर वागळे इस्टेट परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. एका क्षुल्लक वादातून एखाद्याचा जीव घेण्यासारखा गंभीर प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. श्रीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी पुढील तपास करत असून, आरोपीला लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. ही घटना ठाणे शहरात चर्चेचा विषय बनली असून, पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.
वागळे इस्टेट परिसरात घडली घटना
मंगळवारी गौरी गणपतीच्या विसर्जनाची धामधूम सुरू असतानाच हा प्रकार घडल्याने ठाण्यात खळबळ उडाली आहे. संतोष पवार उर्फ संद्या हा गुंड असल्याचे कळते आहे. तो शिंदेंच्या शिवसेनेचा कार्यकर्ता होता. ठाण्यातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानापासून काही अंतरावर असलेल्या वागळे इस्टेट परिसरात ही घटना घडली आहे. ज्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अजून वाढले आहे. मिळालेल्या माहितीनुसार संतोष पांढऱ्या रंगाची फॉक्सवॅगन कार चालव होता. याच कारने विठ्ठलला उडवले.
हे ही वाचा :