बायकोला मारण्यासाठी कत्ती घेऊन गेला अन्...
कैलास गलंडे असं मयत पतीचे नाव आहे. तो आपली पत्नी सुमित्रा गलंडे हिच्यासह सेनगाव तालुक्यातील बाभूळगाव इथं राहत होता. त्याला दारुचं व्यसन होतं. तो दारू पिऊन अनेकदा सुमित्राला त्रास द्यायचा. घटनेच्या दिवशी देखील त्याने मद्यसेवन केलं होतं. यावेळी वाद झाल्यानंतर तो हातात कत्ती घेऊन पत्नी सुमित्रा गलंडे हिला मारण्यासाठी अंगावर धावून गेला. पण हा डाव त्याच्यावरच उलटला.
advertisement
झटापटीत पत्नी सुमित्राने कैलासच्या हातातील कत्ती हिसकावून घेतली आणि त्याच्याच डोक्यात वार केला. हा वार इतका गंभीर होता की, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन पतीचा जागीच मृत्यू झाला. यानंतर घाबरलेल्या सुमित्राने मोटरसायकल मधील पेट्रोल मयत पतीच्या अंगावर ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच पतीने दारुच्या नशेत स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला, असा बनाव देखील तिने रचला.
शवविच्छेदन अहवालातून उलगडलं सत्य
मात्र तिचा बनाव फार काळ टिकला नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर गोरेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र शवविच्छेदनाच्या अहवालात कैलासच्या डोक्याला गंभीर मार आढळल्याचे दिसून आले. डोक्याला लागलेला मार दिसून आल्याने आरोपी सुमित्रा गलंडे हिचे बिंग फुटले. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी पत्नी सुमित्राच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पत्नीनेच पतीची अशाप्रकारे हत्या केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे.