शशिकला पिंटू घुले असं आत्महत्या करणाऱ्या विवाहित महिलेचं नाव आहे. त्यांनी दीड वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. घटनेच्या दिवशी पतीने शशिकला यांना शेतात चरत असलेल्या मेंढ्यांना परत आणण्यास सांगितलं होतं. पण त्यांनी यास नकार दिला. यानंतर संतापलेल्या पतीने शशिकला यांना मारहाण केली. याच रागातून संतप्त विवाहितेने पोटच्या दीड वर्षाच्या चिमुकलीला सोबत घेत लगतच्या शेतातीलच विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असलेलं घुले कुटुंब फुकटा गावात मेंढ्या चरण्यासाठी घेऊन आले होते. त्यांचा मेंढ्या सांभाळण्याचा व्यवसाय आहे. मेंढ्या चारुन आणल्यानंतर त्यांना जाळीत कोंडायचं होतं. मात्र, मेंढ्या शेजारच्या शेतातील पिकाकडे गेल्याने पिंटूने पत्नी शशिकलाला मेंढ्यांना आणण्यास सांगितले. मात्र, शशिकलाने मेंढ्या आणायला नकार दिला. यामुळे संतापलेल्या पिंटूने पत्नीच्या कानशिलात लगावत मेंढ्या आणण्यास सांगितले. शशिकला रागाच्या भरात तिच्या मुलीसह मेंढ्या आणायला गेली. मात्र, तिने पतीच्या रागावर वरघणे यांच्या शेतातील विहिरीत मुलीसह उडी मारुन आत्महत्या केली.
विहिरीत उडी मारताना तेथील काही नागरिकांना तिला बघितला. त्यांनी तत्काळ इतरांना गोळा करत माय लेकीचा मृतदेह विहिरीबाहेर काढला. मृत विवाहितेच्या घरातील नातेवाईकही घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी कुठलीही तक्रार नसल्याचे सांगितले. दोघांच्याही मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. प्रकरणी पोलिसांनी घटनेची नोंद घेत तपासाला सुरुवात केली आहे. वडनेर पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.