संतोष राठोड असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर शुभम पवार, सिद्धार्थ चव्हाण आणि नवीन लाल राठोड असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. या तिन्ही आरोपींवर अंभोरा पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील वाघळूज इथं घडली आहे. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दारुसाठी पैसे न दिल्याच्या कारणातून अशाप्रकारे युवकास अमानुष मारहाण करून चटके दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी तिन्ही आरोपी दारुच्या नशेत होते. तर पीडित तरुण हा गावातील एका टपरी शेजारी असलेल्या बाकड्यावर बसला होता. यावेळी तिन्ही आरोपी त्याठिकाणी आले. त्यांनी दारु प्यायला पैसे मागितले आणि तरुणाला अचानक मारहाण केली. ही मारहाण इतकी भयंकर होती, की मारहाणीत संतोष राठोड बेशुद्ध झाला. बेशुद्ध झाल्यावरही नराधम आरोपी थांबले नाहीत. त्यांनी संतोषच्या गालावर, डोळ्याच्या पापणीवर आणि छातीवर दिले चटके. संतोषवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
