'आम्ही दोघी'मध्ये मुक्ता आणि प्रियाच्या जिव्हाळ्याच्या भावनिक नात्याची कहाणी प्रेक्षकांनी पाहिली होती. पण, 'असंभव'मध्ये त्यांचे नाते पूर्णपणे वेगळ्या परिस्थितीत, गूढता आणि थराराने व्यापलेले असणार आहे. त्यामुळे, एकाच वेळी दोन अभिनेत्रींची केमिस्ट्री आणि सस्पेन्स, ही चित्रपटाची खासियत असणार आहे.
'आम्ही दोघी' नंतर प्रिया-मुक्ताची जोडी पुन्हा गाजवणार स्क्रीन
प्रिया बापट या अनुभवाविषयी बोलताना म्हणाली, "‘आम्ही दोघी’मधील आमचा भावनिक प्रवास खूप खास होता. 'असंभव'मध्ये आम्ही त्याच बंधातून पुन्हा भेटलो आहोत, पण यावेळी हा एक वेगळा अनुभव असेल. मुक्तासोबत काम करताना नेहमीच एक वेगळा उत्साह असतो. ती स्वतःला भूमिकेत झोकून देते आणि त्यामुळे मलाही तिच्यासोबत काम करताना अधिक ऊर्जा मिळते. यात आमच्या नात्याची नवी बाजू, अनेक प्रश्न आणि आश्चर्याचे क्षण अनुभवायला मिळतील."
advertisement
मुक्ता बर्वेनेही प्रिया बापटसोबत काम करण्याचा आनंद व्यक्त केला. ती म्हणाली, "प्रियासोबत काम करणं नेहमीच खूप आनंदाचं असतं. तिच्यासोबत संवाद साधणं खूप सोपं जातं आणि आमच्यात असलेला विश्वास आपोआप वाढतो. ‘आम्ही दोघी’मध्ये आम्ही नात्याची ऊब अनुभवली होती, पण 'असंभव'मध्ये त्या नात्याभोवती थरार, रहस्य आणि भीतीचं वलय आहे. त्यामुळेच काम अधिक रोमांचक झालं आहे. प्रेक्षकांसाठी हा चित्रपट एक अविस्मरणीय अनुभव ठरेल."
नव्या निर्मात्यांचे पहिले पाऊल
'असंभव'चे दिग्दर्शन सचित पाटील यांनी केले आहे, तर पुष्कर सुधाकर श्रोत्री यांनी सहदिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य यांनी मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंट या बॅनरखाली निर्मिती क्षेत्रात एकत्र पाऊल टाकले आहे. या चित्रपटाच्या निर्मितीत शर्मिष्ठा राऊत आणि मंगेश परुळेकर-संजय पोतदार यांचाही सहभाग आहे.
