पद्मविभूषण इल्लैयाराजांची संगीत जादू
'मल्हारी' गाणे आणखीनच खास बनले आहे ते त्याला मिळालेल्या दोन दिग्गज कलाकारांच्या योगदानामुळे. या गाण्याला पद्मविभूषण इल्लैयाराजा यांनी संगीत दिले आहे. इल्लैयाराजा यांच्या खास शैलीतील संगीत आणि महाराष्ट्राची पारंपरिक ऊर्जा यांचा अनोखा मिलाफ या गाण्यात पाहायला मिळतो. 'सारेगमप' फेम गायक अभिजीत कोसंबी यांच्या दमदार आणि भारदस्त आवाजाने गाण्याला एक वेगळीच उंची दिली आहे.
advertisement
दिग्दर्शक संतोष डावखर यांनीच हे गाणे शब्दबद्ध केले आहे. हे गाणे प्रेक्षकांना थेट पारंपरिक गोंधळाचा अनुभव देते, ज्यात श्री खंडोबा देवाचा आविष्कार आणि भव्य शक्तीचा उत्साह प्रभावीपणे दाखवण्यात आला आहे.
वनटेक सीनची चर्चा
'गोंधळ' चित्रपटाने महाराष्ट्राच्या संस्कृतीसोबतच गावातील राजकारण आणि प्रेमी त्रिकोणातून निर्माण झालेले रहस्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले आहे. दिग्दर्शक संतोष डावखर यांनी लोकपरंपरेला आधुनिक रूपात जागतिक स्तरावर नेण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटातील सुमारे २५ मिनिटांचा वनटेक सीन सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. यामुळे वर्ड ऑफ माऊथमुळे चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून 'गोंधळ' चित्रपटाचे शो थिएटरमध्ये वाढवण्यात आले आहेत.
दिग्दर्शक संतोष डावखर यांनी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, "'मल्हारी' गाण्याला प्रेक्षक जी दाद देत आहेत, तो आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. महाराष्ट्राची संस्कृती, गोंधळ परंपरा आणि भक्तीभाव मोठ्या पडद्यावर पोहोचवण्याचा आमचा हेतू होता. प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद हीच आमच्यासाठी सर्वात मोठी कमाई आहे. मी सर्व रसिकप्रेक्षकांना आवाहन करतो की, त्यांनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन नक्की पाहावा."
डावखर फिल्म्स निर्मित या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू यांसारखे नामवंत कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.
