या स्पर्धकाने नुकतीच एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. शाळेत असताना बारावीच्या परीक्षेत तो केवळ 35 टक्के गुणांनी पास झाला होता. विशेष म्हणजे त्याला जवळपास प्रत्येक विषयात 35 टक्केच मार्क्स मिळाले होते. त्या वेळी त्याचा फोटो थेट वर्तमानपत्रात छापून आला होता. "काठावर पास तरीही झक्कास!" अशी भन्नाट हेडलाईन देत त्याची बातमी प्रसिद्ध झाली होती.
advertisement
सगळ्या विषयात 35 टक्के गुण मिळवणारा हा स्पर्धक दुसरा कोणी नसून कोल्हापूरचा डीपी दादा म्हणजेच धनंजय आहे. बिग बॉस मराठी 5 मध्ये डीपी दादा त्याच्या दमदार खेळीमुळे घराघरात पोहोचला होता. त्याने एक जुनी आठवण चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
धनंजयने त्याच्या सोशल मीडियावर त्या काळातील वर्तमानपत्रातील कात्रण शेअर केलं आहे. "खूप वर्षांनी हे सापडलंय हाय काय नाही पहिल्यापासून टॉपला" असं भन्नाट कॅप्शन देत डीपी दादाने पोस्ट शेअर केली आहे.
ही आठवण 2005 सालातील आहे. त्या वेळी धनंजय पोवार इचलकरंजी येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. बारावीतही त्याला आर्ट्स शाखेत 35 टक्के गुण मिळाले होते.
डीपी दादाची पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे. एका चाहत्यानं लिहिलंय, "काठावर पास पण आयुष्यात टॉप". दुसऱ्याने लिहिलंय, "दादा तुमचा विषयच लय हार्ड आहे बघा." आणखी एकानं लिहिलंय, "दादा तू शाळेत जरी काटावर पास झाला असलास तरी आयुष्यात मात्र सर्वात यशस्वी आहेस."
बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर डीपी दादा स्टार प्रवाहच्या 'शिट्टी वाजली रे' या रिअलिटी शोमध्ये दिसले होते. तिथेही त्यांचा कॉमेडी अंदाज प्रेक्षकांना आवडला होता. सोशल मीडियावर मजेशीर व्हिडीओ बनवण्याबरोबरच ते त्यांचा वडिलोपार्जित फर्निचरचा व्यवसाय देखील सांभाळत आहेत.
