19 वर्षीय तरुणीने सचिन संघवी याच्यावर लग्नाचं आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार विलेपार्ले पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या प्रकरणाने संपूर्ण संगीतविश्वात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सचिन संघवी यांना अटक केली. त्यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आलं आहे. सध्या या तपासाची सूत्र सांताक्रूझ पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहेत.
advertisement
इंस्टाग्रामवर झालेली ओळख
तरुणीच्या तक्रारीनुसार, फेब्रुवारी 2024 मध्ये सचिन संघवीने तिला इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवला. 'तुला अल्बममध्ये संधी देतो', असं सांगत त्यांनी तिच्याशी संपर्क साधला. त्यानंतर दोघांचे नंबर एक्सचेंज झाले. दोघांचं बोलणं वाढलं. त्यानंतर सचिनने तिला त्याच्या म्युझिक स्टुडिओत भेटायला बोलावलं. या भेटीत त्याने तिला लग्नाची मागणी घातली. लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्याचा दबाव टाकला.
जबरदस्तीने गर्भपात करायला लावला
तरुणीने आणखी गंभीर आरोप करत सांगितलं की, सचिनने तिला जबरदस्तीने गर्भपात करायला लावला. त्यानंतर तिच्याशी असलेले सगळे संपर्क तोडले. वारंवार प्रयत्न करूनही प्रतिसाद न मिळाल्याने तिने अखेर पोलिसांकडे धाव घेतली.
सचिन-जिगरची जोडी बॉलिवूडमध्ये लोकप्रिय
सचिन-जिगर ही जोडी बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय संगीतकारांपैकी एक आहे. त्यांनी अनेक सुपरहिट गाणी केली आहे. त्यांच्या गाण्यांमध्ये 'तेरे वासते', 'अपना बना ले', 'फिर और क्या चाहिए', 'गुलाबी, 'तैनू खबर नहीं' सारख्या गाण्यांचा समावेश आहे.
