बोमन ईरानी असं या अभिनेत्याचं नाव आहे. त्यांनी आपल्या वयाच्या 44 व्या वर्षी इंडस्ट्रीत पदार्पण केलं. आज बोमन ईरानी आपला 66 वा वाढदिवस साजरा करत आहेत. बोमन ईरानी खूप लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या आईनेच त्यांचे संगोपन केले. बोमन यांना लहानपणी एक आजार झाला होता. त्यामुळे त्यांचे अभ्यासात लक्ष नसायचे. या आजारामुळे अनेकदा लोक त्यांची चेष्टा करायचे. हे पाहून त्यांच्या आईने त्यांना एका थेरपीसाठी पाठवायला सुरुवात केली आणि हळूहळू बोमन या परिस्थितीतून सावरले आणि त्यांनी शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर उपजीविकेसाठी त्यांनी वेगवेगळे व्यवसाय केले. कधी बेकरीत काम केले, कधी चिप्स विकले, तर कधी रेस्टॉरंटमध्ये वेटरची नोकरीही केली.
advertisement
ताज हॉटेलमध्ये केलेलं काम
बोमन ईरानी यांनी सिने इंडस्ट्रीत पदार्पण करण्याआधी मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेलमध्येही काम केले आणि तिथे त्यांना खूप काही शिकायला मिळाले. मात्र, त्याच काळात त्यांच्या आईची तब्येत खराब झाली, आणि कुटुंबाची जबाबदारी बोमन यांच्या खांद्यावर आली. घर सांभाळण्यासाठी त्यांनी आईची बेकरीही चालवायला सुरुवात केली आणि दीर्घकाळ त्या बेकरीत काम केले. त्यांच्या बेकरीमध्ये मुख्यतः चिप्स बनवले व विकले जायचे.
लहानपणापासूनच अभिनयाची ओढ
बोमन लहानपणापासूनच अभिनेता होण्याचे स्वप्न बाळगून होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी हंसराज सिंध्यांकडून अभिनयाचे धडे गिरवले आणि थिएटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. याच काळात त्यांची ओळख काही नामांकित अभिनेते आणि दिग्दर्शकांशी झाली, ज्यांनी त्यांना चित्रपटांमध्ये भूमिका ऑफर केल्या. सुरुवातीला बेकरीची जबाबदारी असल्याने त्यांनी काही ऑफर नाकारल्या, पण अखेर 2001 मध्ये त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यांची सुरुवात इंग्रजी चित्रपटांपासून झाली, पण त्यांना खरी ओळख 2003 मध्ये आलेल्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटामुळे मिळाली. ज्यात त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले. त्यानंतर त्यांनी युवराज, तीन पत्ती, हाऊसफुल, आणि 3 इडियट्ससह अनेक हिट चित्रपट दिले.
