न्यूज 18 मराठीसोबत बोलताना महेश मांजरेकर म्हणाले,"दशावतार' या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. मराठी सिने-इंडस्ट्रीसाठी ही खूप सकारात्मक बाब आहे. रिलीजच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी तीन शो होते त्याठिकाणी आता सहा आणि आठ शो वाढवण्यात आले आहेत. याहून चांगली बातमी असूच शकत नाही. दिग्दर्शकाचं मला खूप कौतुक आहे. सुबोध खानोलकरचा हा पहिलाच चित्रपट आहे. ज्यापद्धतीने त्याने हा चित्रपट बनवलाय त्याला तोड नाही. असचं यश त्याला पुन्हा-पुन्हा मिळत राहूदेत..आणि मराठी इंडस्ट्रीचं नाव मोठं होऊदेत".
advertisement
Dashavatar Collection : 'दशावतार' पहिल्याच दिवशी 'आरपार'! बॉक्स ऑफिसवर केली इतकी कमाई
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार,'दशावतार' या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशीच देशात 57 तर जगभरात 65 लाखांची कमाई केली आहे. एकीकडे 'आरपार' आणि 'बिन लग्नाची गोष्ट' असे तगडे चित्रपट असताना 'दशावतार' हा आरपार कमाई करण्यात यशस्वी ठरला आहे. आता वीकेंडला या चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ झाली आहे. कोटींच्या दिशेने कमाई करण्यासाठी या चित्रपटाची वाटचाल सुरू आहे.
'दशावतार' या चित्रपटात कलेचा, भक्तीचा आणि परंपरेचा उत्सव उत्तमरित्या चित्रित करण्यात आला आहे. बाबुली मेस्त्रीचा अनोखा अवतार या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. एकंदरीतच गावकुसापासून ते देवभूमीपर्यंतचा प्रवासाची झलक या चित्रपटात पाहायला मिळत आहे. मुंबई-पुण्यासह ग्रामीण भागातही या चित्रपटाचं कौतुक होत आहे. फक्त कोकणावरच नव्हे तर निसर्गावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठीचा हा चित्रपट आहे.
सुबोध खानलोकर याने या चित्रपटाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सुबोधचा हा पहिलाच चित्रपट आहे. गुरू ठाकूरने या चित्रपटाचे संवाद आणि गीत लिहिलं आहे. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, रवी काळे, अभिनय बेर्डे, सुनील तावडे, आरती वडगबाळकर, लोकेश मित्तल अशी तगडी फौज या चित्रपटात आहे.