बाबासाहेबांनी वापरलेला पेन, चष्मा आणि घड्याळ पाहायचं? पुण्यात या ठिकाणी नक्की भेट द्या!
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
Ambedkar Museum: संग्रहालयाच्या संचालक संजीवनी मुजुमदार यांनी लोकल 18शी बोलताना सविस्तर माहिती दिली.
पुणे: विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्याला समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा देखील लाभला आहे. शहरामध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत, ज्यातून पुण्याची ऐतिहासिक ओळख दिसते. सेनापटी बापट (एसबी) रोडवरील बाबासाहेब आंबेडकर वस्तुसंग्रहालय देखील असंच ठिकाण आहे. या ठिकाणी बाबासाहेबांच्या अनेक दैनंदिन वापरातील वस्तू बघायला मिळतात. संग्रहालयाच्या संचालक संजीवनी मुजुमदार यांनी लोकल 18शी बोलताना सविस्तर माहिती दिली.
भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैयक्तिक जीवनाशी निगडीत अनेक महत्वाच्या वस्तू, दस्तऐवज आणि दुर्मिळ वस्तू या संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. हे संग्रहालय पुण्यातील सिम्बॉयसिस कॉलेज परिसरात आहे. या संग्रहालयाची पायाभरणी 14 एप्रिल 1990 रोजी म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी करण्यात आली होती. या भव्यदिव्य वास्तुची संकल्पना धनंजय दातार यांनी मांडली होती. 26 नोव्हेंबर 1990 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा हस्ते या संग्रहालयाचं उद्घाटन करण्यात आलं होतं.
advertisement
या संग्रहालयात बाबासाहेबांच्या दैनंदिन वापरातील वस्तू, जसे की त्यांचे कपडे, पेन, चष्मा, टाय, बूट, घड्याळ, भांडी, तसेच त्यांच्या वाचन-लेखनाशी संबंधित साहित्य जपून ठेवण्यात आलं आहे. इतकंच नाही तर त्यांच्या राहणीमानाचं प्रत्यक्ष दर्शन घडवणाऱ्या वस्तूही या ठिकाणी बघायला मिळतात. बाबासाहेबांच्या विद्यार्थीदशेत आणि कायद्याच्या अभ्यासकाळातील काही मौल्यवान वस्तूंची नोंद देखील येथे आहे.
advertisement
बाबासाहेबांच्या वाचन संस्कृतीचं प्रतिबिंब दाखवणारा दुर्मिळ ग्रंथसंग्रह हा या संग्रहालयातील सर्वात महत्वाचा भाग आहे. समाज सुधारणा, कायदा, अर्थशास्त्र, इतिहास आणि धर्म यासंबंधी त्यांनी वाचलेली तसेच अभ्यासासाठी वापरलेली पुस्तकं या ठिकाणी जतन करून ठेवली आहेत.
सिम्बॉयसिस कॉलेजचे कुलगुरू एस. बी मुजुमदार आणि त्यांचा पत्नी संजीवनी मुजुमदार यांच्या अथक प्रयत्नानंतर 1982 साली दिल्लीवरून बाबासाहेब आंबेडकरांच्या दैनंदिन वापरातील मौल्यवान वस्तू दोन ट्रकमधून पुण्यात आणण्यात आल्या. त्या वस्तू संग्रहालयात बघायला मिळतात. दरवर्षी लाखो भारतीय आणि विदेशी पर्यटक संग्रहालयाला भेट देतात.
advertisement
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तुसंग्रहालय उभारण्यात बाबासाहेबांच्या पत्नी सविता माईसाहेब आंबेडकर यांचा महत्वाचा वाटा होता. माईसाहेब आंबेडकर हयात असताना त्या आपल्या पतीच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त या वस्तुसंग्रहालयाला भेट देत असत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 13, 2025 5:00 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बाबासाहेबांनी वापरलेला पेन, चष्मा आणि घड्याळ पाहायचं? पुण्यात या ठिकाणी नक्की भेट द्या!