'देवखेळ' वेबसीरीजच्या टीझर आणि ट्रेलरमध्ये 'शंकासुर' बाबत अपमानास्पद मजकुर असल्याचा आरोप गुहागरमधील गावकऱ्यांनी केला होता. जर, टीझर आणि ट्रेलर तात्काळ सोशल मीडियावरून डिलिट केला नाही तर तुमचं कार्यालय फोडू, असा थेट त्यांनी इशाराच दिला आहे. धार्मिक भावना भडकवत असल्याचा आरोप गुहागरमधील नागरिकांनी निर्मात्यांवर केला आहे. रिलीज होताच वेबसीरीज सोशल मीडियावर तुफान चर्चेत आली आहे. 'आपलं गुहागर' या सामाजिक संस्थेच्या वतीने गुहागर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहित आणि माहिती तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
advertisement
ही तक्रार ॲड. संकेत अरुण साळवी, प्रेसिडेंट- गुहागर बार असोसिएशन आणि 'आपलं गुहागर'चे समन्वयक यांनी दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी गुहागर पोलीस निरीक्षकांकडे सादर केली आहे. तक्रारीनुसार, ‘देवखेळ’ वेबसीरिजच्या टीझरमध्ये शंकासुर देवाला क्रूर, अमानवी आणि अंधश्रद्धेशी जोडलेला देव म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेषतः “संकासुर शिक्षा करतो, बळी घेतो”, “होळीत दरवर्षी खून करण्याची प्रथा आहे” अशा संवादांमुळे भाविक वर्गाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप आहे. शंकासुर देव हे गुहागर परिसरातील प्राचीन श्रद्धास्थान असून, शिमगोत्सव काळात हजारो भाविक श्रद्धेने उपासना करतात. Zee5 च्या अधिकृत युट्युब चॅनेलवर 21 जानेवारी 2026 रोजी रिलीज झालेल्या ट्रेलरला आतापर्यंत 8 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्याने हा आक्षेपार्ह मजकूर देशभर प्रसारित झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे समाजात असंतोष निर्माण झाला असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
