फर्स्ट डे, फर्स्ट शो अन् चाहत्याचा दुर्दैवी शेवट!
साउथमध्ये चित्रपट प्रदर्शित होणं म्हणजे एखाद्या उत्सवासारखं असतं. हैदराबादच्या कुकटपल्ली येथील 'अर्जुन थिएटर'मध्येही अशीच गर्दी होती. सकाळपासूनच चाहते फटाके फोडून आणि ढोल-ताशांच्या गजरात चिरंजीवींच्या नव्या सिनेमाचा जल्लोष साजरा करत होते. चित्रपट सुरू असताना, एक चाहता आपल्या जागेवर बसून सिनेमाचा आनंद घेत होता. मात्र, अचानक त्याच्या छातीत कळ आली आणि तो खाली कोसळला.
advertisement
सोशल मीडियाचा डॉन पहिल्याच दिवशी ढसाढसा रडला, प्रभू शेळकेला नडणारा कोण? नव्या प्रोमोमुळे खळबळ
मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपट सुरू असतानाच या व्यक्तीचा श्वास कोंडला गेला आणि त्याला हार्ट अटॅक आला. थिएटरमधील इतर प्रेक्षकांनी त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून, त्यात पोलीस आणि कर्मचारी त्या चाहत्याचा मृतदेह थिएटरबाहेर घेऊन जाताना दिसत आहेत.
पोलिसांचा प्राथमिक अंदाज
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासानुसार, अतिउत्साह किंवा टाळ्या-शिट्ट्यांच्या आवाजात झालेल्या गोंधळामुळे या व्यक्तीच्या हृदयावर ताण आला असावा आणि त्याला हृदयविकाराचा झटका आला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. अद्याप या मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण थिएटरमध्ये आणि चिरंजीवींच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार्स आपल्या चाहत्यांच्या बाबतीत नेहमीच हळवे असतात. यापूर्वी जेव्हा अभिनेता सूर्याच्या एका चाहत्याचा अपघात झाला होता, तेव्हा सूर्याने स्वतः त्याच्या घरी जाऊन सांत्वन केलं होतं. अशा परिस्थितीत, आपल्या नव्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशीच एका चाहत्याने प्राण गमावल्यामुळे चिरंजीवी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अद्याप चित्रपट निर्माते किंवा अभिनेत्याकडून कोणतंही अधिकृत विधान आलेलं नाही.
