तमिळ सिनेमातील 'सबेश-मुरली' जोडी तुटली
एम.सी. सबेसन, ज्यांना लोक प्रेमाने 'सबेश' या नावानेही ओळखत असत, त्यांचे गुरुवारी २३ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाने तमिळ संगीतविश्वात शोककळा पसरली आहे. तमिळ सिनेसृष्टीत सबेसन यांनी त्यांचा भाऊ मुरली यांच्यासोबत 'सबेश-मुरली' या संगीत दिग्दर्शक जोडीने मोठे नाव कमावले होते. सबेसन यांच्या निधनाने ही लोकप्रिय जोडी आता तुटली आहे.
advertisement
अचानक तब्येत बिघडल्याने निधन
अभिनेते कायल देवराज यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून सबेसन यांच्या निधनाची बातमी दिली. त्यांनी सांगितले की, तमिळ संगीतकार आणि गायक सबेसन यांचे गुरुवारी दुपारी १२:१५ वाजता चेन्नईमध्ये अचानक तब्येत बिघडल्यामुळे निधन झाले. सबेसन हे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक थेनिसाई थेंड्राल देवा यांचे लहान भाऊ होते आणि ते फिल्म संगीतकार संघाचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते.
सबेश आणि मुरली या दोघांनी मिळून 'गोरिपलायम', 'मिलगा', 'थवमई थवमिरुंधु', 'पाराई', 'अदैकालम', 'इमसाई अरासन २३वीं पुलिकेसी', 'पोक्किशम' आणि 'एंगल आसन' अशा अनेक चित्रपटांसाठी अविस्मरणीय संगीत दिले आहे. ते संगीत दिग्दर्शक असण्यासोबतच पार्श्वगायकही होते.
सबेसन यांच्या पश्चात दोन मुली गीता, अर्चना आणि अभिनेता असलेला मुलगा कार्तिक असा परिवार आहे. सबेसन यांच्यावर शुक्रवार, २४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता चेन्नईमध्ये अंतिम संस्कार केले जातील.
सिनेसृष्टीसाठी मोठा धक्का
गेल्या एकाच आठवड्यात बॉलिवूड-टीव्हीमधील पंकज धीर, ज्येष्ठ अभिनेत्री मधुमती आणि कॉमेडीयन असरानी यांच्या निधनानंतर आता सबेसन यांचे जाणे हे भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक मोठे नुकसान आहे.
