एरवी मतदानाची शाई एकदा बोटावर लागली की महिनाभर ती रंग सोडत नाही. पण यंदा निवडणूक आयोगाने पारंपरिक शाईच्या बाटलीऐवजी मार्कर पेनचा वापर केला आहे. हाच मार्कर आता प्रशासनासाठी डोकेदुखी ठरला आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमधील अनेक केंद्रांवरून तक्रारी येत आहेत की, ही शाई साध्या पाण्याने किंवा रुमालाने पुसली तरी सहज निघून जात आहे.
advertisement
पहिलीच मकर संक्रात अन् कोकण हार्टेड गर्लने दिली गुड न्यूज? VIDEO मध्ये अंकिता-कुणालने सगळंच सांगितलं
विरोधकांनी या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेतला असून, "जर शाईच पुसली गेली, तर एकाच व्यक्तीने दोन-दोनदा मतदान केल्यास ओळखणार कसं?" असा प्रश्न उपस्थित करत हा लोकशाहीचा अपमान असल्याची टीका केली आहे.
जान्हवी किल्लेकरचा सवाल
या वादात आता 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने उडी घेतली आहे. जान्हवीने एक व्हिडिओ शेअर करत निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभं केलं. ती म्हणाली, "मी सकाळी मतदान केलं, त्याचा फोटोही टाकला. पण घरी येऊन जेवण केल्यावर जेव्हा हात धुतले, तेव्हा पाहते तर काय... बोटावरची शाई जवळपास पूर्ण पुसली गेली होती. पूर्वी ही शाई दोन-दोन महिने निघायची नाही, मग आता काही तासांतच कशी गायब झाली? नक्की काय घडतंय?" जान्हवीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकरीही आपापले अनुभव सांगू लागले आहेत.
दरम्यान, जान्हवीच्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. एकाने म्हटलंय, "शाई सोड, साबण कोणता ते सांग." तर दुसऱ्याने म्हटलंय, "त्यांना हे सांगितलं ना, तर म्हणतील तुमचा साबण खूप भारीतला आहे." आणखी एकाने जान्हवीला थेट पुन्हा एकदा मतदान करण्याचा सल्ला दिला आहे.
बोगस मतदानाची भीती वाढली
राजकीय वर्तुळातून यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. बोगस आणि दुबार मतदारांना आळा घालण्यासाठी ही शाई सर्वात मोठं शस्त्र असतं. पण जर शस्त्रच निकामी झालं, तर निवडणुकीच्या पारदर्शकतेवर शंका उपस्थित होणं स्वाभाविक आहे. काही ठिकाणी तर मतदारांनी ही शाई पुसून पुन्हा मतदानाचा प्रयत्न कोणी केला तर काय होईल असा सवालही करत आहेत, ज्यामुळे तणाव वाढला आहे.
निवडणूक आयोगाने अद्याप यावर अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही, मात्र अनेक मतदान केंद्रांवर आता मार्करऐवजी पुन्हा जुन्या शाईच्या बाटल्या मागवण्याची धावपळ सुरू झाली आहे.
