2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल काही वेळातच जाहीर होतील. यंदा अनेक सेलिब्रिटी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यात रामायण' फेम अरुण गोविल यांचा देखील समावेश आहे. ते उत्तर प्रदेशातील त्यांची जन्मभूमी मेरठ मधून उभे आहेत. अशातच सर्वांच्या नजरा मेरठच्या सीटवर आहेत. ही जागा भाजपसाठी महत्त्वाची आहे. गेल्या तीन वेळा इथे भाजप विजयी होत आहे. त्यामुळे आता यंदा अरुण गोविल बाजी मारणार का हे पाहणं महत्वाचं आहे.
advertisement
मेरठमधून अरुण गोविल यांच्या विरोधात समाजवादी पक्षाच्या सुनीता वर्मा या उभ्या आहेत. सुनीता वर्मा या मेरठच्या माजी महापौर असल्याची माहिती आहे. इंडिया टुडे-ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार मेरठ ही जागा भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची जागा आहे. तसंच यावेळीही भाजपच्या विजयाची शक्यता दाट आहे.
अरुण गोविल त्यांच्याआधी भाजपकडून राजेंद्र अग्रवाल गेल्या सलग तीन वेळा इथून निवडणूक लढवून जिंकले आहेत. यावेळी राजेंद्र अग्रवाल यांच्या जागी अरुण गोविल यांना तिकीट मिळाले असून अंदाजानुसार अरुण गोविल यांच्या विजयाची शक्यता आहे.
POLSTRAT आणि PEOPLES INSIGHT च्या एक्झिट पोलनुसार अरुण गोविल यांना जवळपास 52 टक्के मतं मिळू शकतात. मात्र, काही एक्झिट पोल आणि तज्ज्ञांच्या मते अरुण गोविल यांच्यासाठी विजयाचा मार्ग तितका सोपा नाही. अरुण गोविल यांची समाजवादी पक्षाच्या उमेदवार सुनीता वर्मा यांच्याशी काटे की टक्कर आहे.
अरुण गोविल यांना घराघरात ओळखतात. अरुण गोविल यांनी रामानंद सागर यांच्या रामायणात रामाची भूमिका साकारली होती. या शोमुळे त्यांना रातोरात प्रसिद्धी मिळाली. लोक त्यांची देवाप्रमाणे पूजा करायचे. अरुण गोविल यांचं जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.
मेरठमधून निवडणूक लढवण्याबाबत अरुण गोविल यांनी, 'मेरठच्या जागेवर फक्त भाजपच जिंकेल. मला विजयाबद्दल शंका नाही, आम्ही नक्कीच जिंकू. या निवडणुका खरे तर विकसित भारताच्या निवडणुका आहेत आणि कोणाला निवडून द्यायचं हे जनतेला माहीत आहे.' अशा भावना व्यक्त केल्या होत्या. आता अरुण गोविल यांच्या विजयासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.