महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो केवळ आपल्या राज्यातच नाही, तर देश आणि जगभरात मोठ्या संख्येने पाहिला जातो. या शोचे चाहते फक्त सामान्य प्रेक्षकच नाहीत, तर देशातील काही मोठी नावंही आहेत. खुद्द महानायक अमिताभ बच्चन आणि भारताची गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकरही या कार्यक्रमाच्या फॅन होत्या. आता या यादीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचाही समावेश झाला आहे.
advertisement
खुद्द मुख्यमंत्र्यांनी केलं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ चं कौतुक
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधील लोकप्रिय विनोदवीर समीर चौघुले यांनी सोनी मराठीच्या एका कार्यक्रमात एक खास किस्सा सांगितला. समीर चौघुले म्हणाले, “एकदा मी विमानात फडणवीस साहेबांना भेटलो. तेव्हा ते म्हणाले, ‘चौघुले, जरा इथे या, हे बघा...’ मला वाटलं आता काय दाखवत आहेत? तर त्यांनी त्यांच्या मोबाईलची टाइमलाइन दाखवली. ती पूर्णपणे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या एपिसोड्सने भरलेली होती.”
फडणवीस म्हणाले, “हे बघा टाइमलाइन दिसतेय तुम्हाला… फक्त ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च आहे. आम्ही फक्त तुमचेच एपिसोड्स बघत असतो.” मुख्यमंत्र्यांनी स्वतः आपल्या कामाचं कौतुक केल्याने समीर चौघुले खूपच आनंदी झाले. पॉडकास्टमध्ये हा अनुभव सांगत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसत होता.
दरम्यान, कामाबद्दल बोलायचं झाल्यास, समीर चौघुले नुकतेच सई ताम्हणकर, प्रसाद ओक आणि ईशा डे यांच्यासोबत ‘गुलकंद’ (Gulkand) या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. प्रेक्षकांनी या चित्रपटाला पसंती दर्शवली होती.