२९ वर्षांनी महेश मांजरेकरांची रंगभूमीवर एन्ट्री
'शंकर-जयकिशन' हे नाटक खास असण्याचे मुख्य कारण म्हणजे, मराठीतील दोन दिग्गज, महेश मांजरेकर आणि भरत जाधव पहिल्यांदाच रंगभूमीवर एकत्र झळकणार आहेत. विशेष म्हणजे, महेश मांजरेकर तब्बल २९ वर्षांनंतर पुन्हा रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत. त्यांच्यासाठी आणि प्रेक्षकांसाठीही ही एक पर्वणीच असणार आहे.
नाटकाच्या कथानकात वडिलांच्या आणि मुलीच्या नात्यात अचानक कोणी तिसरा प्रवेश करतो. तो व्यक्ती जीवनात का येतो? त्याच्या येण्यामागचे रहस्य काय? या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना नाटक पाहिल्यावरच मिळणार आहेत. दिग्दर्शन सुरज पारसनीस यांनी केले आहे, तर लेखन विराजस कुलकर्णी याचे आहे.
advertisement
नात्यांची वेगळी बाजू उलगडणार
दिग्दर्शक सुरज पारसनीस यांच्या मते, हे नाटक फक्त हसवणारे नाही, तर नात्यांमधील अदृश्य धाग्यांना भिडणारे आहे. यातून मैत्री आणि पितृत्वाच्या नात्याची एक वेगळी बाजू प्रेक्षकांसमोर येणार आहे. निर्माते आणि अभिनेते भरत जाधव सांगतात, "महेशजी आणि मी अनेक वर्षांपासून मित्र आहोत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटांमध्ये मी काम केले आहे. आम्ही एकमेकांच्या अपेक्षा उत्तम प्रकारे जाणतो. त्यांच्यासोबत काम करणे नेहमीच अनोखा अनुभव असतो."
भरत जाधव यांना खात्री आहे की, त्यांची आणि महेश मांजरेकर यांची केमिस्ट्री रंगभूमीवर वेगळी जादू निर्माण करेल.
'नाटक' हेच माझे पहिले प्रेम! - मांजरेकर
महेश मांजरेकर यांनी त्यांच्या पुनरागमनाबद्दल भावूक मत व्यक्त केले. ते म्हणाले, "२९ वर्षांनंतर रंगभूमीवर परत येणे ही माझ्यासाठी भावनिक गोष्ट आहे. नाटक हे माझ्यासाठी नेहमीच अग्रस्थानी आहे, पण चित्रपटांमुळे नाटकाला वेळ देता आला नाही." 'शंकर-जयकिशन'चे कथानक वाचताच त्यांना जाणवले की, हे नाटक रंगभूमीवर आलेच पाहिजे. भरत जाधव यांचे कौतुक करताना ते म्हणाले, "भरत प्रामाणिक, संवेदनशील आणि ऊर्जा असलेला कलाकार आहे."
भरत जाधव एंटरटेन्मेंट निर्मित या नाटकाचा शुभारंभ १९ डिसेंबर रोजी विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात होणार आहे. या नाटकात भरत जाधव, महेश मांजरेकर यांच्यासह शिवानी रांगोळे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
