न्यायालयाचा निर्णय पायदळी तुडवला!
न्यायालयाने चित्रपटाला परवानगी दिली असतानाही, पुण्यात झालेला हा प्रकार मराठी कलाविश्वासाठी चिंताजनक ठरला आहे. याच घटनेवर एका लोकप्रिय अभिनेत्रीने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. मराठीसह हिंदीमध्ये आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावणारी ती अभिनेत्री आहे प्रिया बापट. प्रिया बापटने या दादागिरीचा निषेध केला आहे.
प्रिया बापटचा संतप्त सवाल
advertisement
अभिनेत्री गिरीजा ओकचे पती आणि निर्माते सुहृद गोडबोले यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. गोडबोले यांनी म्हटले की, "एका चित्रपटाचं प्रदर्शन जबरदस्तीने बंद पाडण्यात आलं. ही सत्तेची उघड आणि बेकायदेशीर धमकी होती, ज्यामुळे निर्मात्यांचं नुकसान झालंच, पण त्याहून अधिक नुकसान लोकशाहीचं झालं. कारण, चक्क न्यायालयाचा आदेश पायदळी तुडवला गेला."
प्रिया बापटने सुहृद गोडबोले यांची ही पोस्ट आपल्या सोशल मीडियावर रिपोस्ट करत आपला निषेध नोंदवला. ती म्हणाली, "एखाद्या चित्रपटाचे नाव हे त्याची कथा आणि पात्र यावरून ठरते आणि ते ठरवण्याचे स्वातंत्र्य दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांना असायलाच हवे. कोणाला यात खुसपटं काढण्याची गरज नाही."
'कलाकार आणि निर्माती म्हणून निषेध करते!'
"एक कलाकार आणि निर्माती म्हणून काल जे घडलं, त्याचा मी निषेध करते," असे परखड मत प्रिया बापटने मांडले आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून चित्रपट प्रदर्शन रोखल्याबद्दल तिने मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांच्या भावनांना वाचा फोडली आहे. 'मनाचे श्लोक' या शीर्षकावरून सुरू झालेला हा वाद आता 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य विरुद्ध श्रद्धा' असा नवा राजकीय रंग घेत आहे.