ते स्वप्न अर्धंच राहिलं
प्रसाद ओक सध्या आपल्या १०० व्या चित्रपट ‘वडापाव’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 'कलाकृती मीडियाला' दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना प्रसाद ओक म्हणाला, “माझं लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम करण्याचं स्वप्न होतं. काही अंशी ते पूर्णही झालं होतं.”
प्रसादने खुलासा केला की, तो एका नाटकात मुख्य भूमिकेत होता आणि त्या नाटकात लक्ष्मीकांत बेर्डे पाहुणे कलाकार म्हणून असणार होते. "जवळपास १५-२० दिवस आम्ही नाटकाच्या तालमीसाठी एकत्र कामही केलं," असं प्रसादने सांगितलं. मात्र, नेमकं त्याचवेळी दुर्दैवाने लक्ष्मीकांत बेर्डे यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे ते नाटक त्यांना करता आलं नाही. प्रसादच्या मनात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत सिनेमात किंवा नाटकात काम करण्याची इच्छा तशीच अपूर्ण राहिली.
advertisement
अभिनय बेर्डेत दिसतात 'लक्ष्या'चे संस्कार
प्रसादने यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे याच्याबद्दलही आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला, “मला ‘लक्ष्या’सोबत काम करता आलं नाही, पण नशिबाने आता मी त्यांचा मुलगा अभिनय बेर्डेसोबत काम करतोय.”
प्रसाद म्हणाला की, "अभिनयमध्ये त्याचे वडील लक्ष्मीकांत यांचे अनेक चांगले गुण उतरले आहेत. अभिनय खूप शिस्तप्रिय आहे. तो लाघवी, प्रेमळ आणि माणसं जोडणारा आहे. कामाप्रति आदर ठेवून तो प्रत्येक गोष्ट मनापासून करतो. अभिनयनेही आता वडिलांप्रमाणे यशस्वी चित्रपटांची सुरुवात केली आहे."
प्रसाद ओकचा आगामी चित्रपट ‘वडापाव’मध्ये गौरी नलावडे आणि रितिका श्रोत्रीसोबत अभिनय बेर्डेचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.