आईच्या शेवटच्या क्षणांत पंकज होते सोबत
पंकज त्रिपाठी यांच्या कुटुंबाने या दुःखाच्या प्रसंगी एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, श्रीमती हेमवंती देवी यांनी आपल्या प्रियजनांच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या सान्निध्यात अखेरचा श्वास घेतला. त्या ८९ वर्षांच्या होत्या आणि वयानुसार असलेल्या आरोग्याच्या समस्यांमुळे गेल्या काही काळापासून त्यांची तब्येत ठीक नव्हती.
advertisement
हेमवंती देवी यांचे निधन बिहारमधील गोपालगंज येथील बेलसंड गावात त्यांच्या घरी झाले. शांतपणे झोपेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. दोन वर्षांपूर्वीच २०२३ मध्ये पंकज त्रिपाठी यांचे वडील पंडित बनारस तिवारी यांचे ९९ वर्षांच्या वयात निधन झाले होते. आईच्या तब्येतीमुळे अभिनेते पंकज त्रिपाठी हे शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत गावी उपस्थित होते.
पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार
पंकज त्रिपाठी यांच्या मातोश्रींवर शनिवारी पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य, नातेवाईक आणि त्यांचे जवळचे मित्र उपस्थित होते. त्रिपाठी कुटुंबाने माध्यमांना आणि चाहत्यांना या दुःखाच्या काळात त्यांच्या खासगीपणाचा आदर करण्याचे विनम्र आवाहन केले आहे.
पंकज त्रिपाठींवर कोसळला दुःखाचा डोंगर
पंकज त्रिपाठी हे त्यांच्या मुळांशी आणि गावाशी जोडलेले आहेत. ते नेहमीच त्यांच्या साधेपणासाठी चर्चेत राहतात. अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी सांगितले आहे की, त्यांच्या पालकांना त्यांना डॉक्टर बनवायचे होते. पण अभिनयाची निवड केल्यानंतरही त्यांच्या पालकांचा त्यांना नेहमीच पाठिंबा राहिला. त्यांना फक्त आपल्या मुलाचे यश आणि आनंद महत्त्वाचा होता. वडिलांच्या निधनानंतर आता आईचेही छत्र हरपल्याने पंकज त्रिपाठी यांच्यावर मोठा आघात झाला आहे.
