'ही क्लिप माझ्या परवानगीशिवाय वापरली!'
काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात 'स्पेशल ऑप्स' या गाजलेल्या वेब सीरिजमधील 'हिम्मत सिंग'ची भूमिका साकारणारा अभिनेता के. के. मेनन दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो म्हणतोय, "थांबा... स्क्रोल करणं थांबवा. जर तुम्ही ही रील पाहत असाल, तर त्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे?" यानंतर व्हिडिओमध्ये 'वोट चोरी'विरुद्धच्या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.
advertisement
पण, के. के. मेननने या व्हिडिओवर नाराजी व्यक्त केली आहे. त्याने स्पष्टपणे सांगितलं आहे की, 'मी या मोहिमेचा भाग नाही. माझ्या 'स्पेशल ऑप्स' या वेब सीरिजची एक प्रमोशनल क्लिप एडिट करून माझ्या परवानगीशिवाय वापरली गेली आहे.' मेननच्या म्हणण्यानुसार, हा व्हिडिओ वापरण्यापूर्वी काँग्रेसने त्याची परवानगी घेतली नव्हती.
काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्येही 'हिम्मत सिंग काहीतरी बोलत आहेत, ते लगेच अंमलात आणा' असं लिहिलं होतं, ज्यामुळे लोकांना या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं गेलं होतं. व्हिडिओमध्ये 'स्पेशल ऑप्स'च्या दुसऱ्या सिझनचं थीम साँगही वापरलं होतं. के. के. मेननने दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे आता काँग्रेसच्या मोहिमेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अनेक नेटकऱ्यांनी मेननच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे आणि काँग्रेसवर टीका केली आहे.