नदीत हळद धुण्यासाठी गेला अन्...
दोन महिन्यांपूर्वी 'राजा शिवाजी' चित्रपटातील एका गाण्याचे चित्रीकरण संगम माहुली परिसरात सुरू होते. या गाण्यात हळदीचा सीन असल्याने डान्सर्स आणि आर्टिस्टच्या अंगावर आणि वेशभूषेवर हळद लागली होती.
चित्रीकरण संपल्यानंतर हळद धुण्यासाठी सौरभ शर्मा आपल्या काही सहकाऱ्यांसोबत कृष्णा नदीवर अंघोळीसाठी गेला. याच दरम्यान त्याचा नदीत बुडून करुण अंत झाला. दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर त्याचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला होता. सौरभ हा मूळचा जोधपूरचा होता आणि चित्रपटसृष्टीत डान्सर म्हणून काम करण्यासाठी मुंबईत आला होता.
advertisement
रितेशने घेतला माणुसकीचा पुढाकार
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच रितेश देशमुख, निर्माती जिनिलिया देशमुख आणि नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. रितेशने स्वतः जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना भेटून शोधमोहीम वेगाने करण्याची विनंती केली होती. त्यावेळी रितेश देशमुखने सौरभ शर्मा यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले होते. हा मदतनिधी मिळवून देण्यासाठी त्याने विशेष प्रयत्न केले.
आईच्या खात्यात ट्रान्सफर केले १५ लाख
रितेश देशमुख नुसता आश्वासन देऊन थांबला नाही, तर त्याने तो शब्द खरा करून दाखवला. चित्रपटासाठी काढण्यात आलेल्या इन्शुरन्स कंपनीने १५ लाख रुपयांचा क्लेम मंजूर केला. ही रक्कम इन्शुरन्स कंपनीने देताच, रितेश यांनी ती रक्कम कोणताही दिरंगाई न करता सौरभ शर्मा याच्या आईच्या बँक खात्यावर तातडीने ट्रान्सफर केली.
रितेश देशमुखने केलेल्या या मदतीमुळे इंडस्ट्रीत त्याच्या माणुसकीची खूप चर्चा होत आहे. 'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज'चे जनरल सेक्रेटरी अशोक दुबे यांनीही रितेशचे खास आभार मानले आहेत.
