राज ठाकरेंच्या मनसेला 'जय महाराष्ट्र'
रमेश परदेशी यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतलेल्या एका पदाधिकारी आढावा बैठकीनंतर घेतला. पुणे येथील या बैठकीत राज ठाकरेंनी आगामी निवडणुकीच्या कामात आणि पक्षबांधणीत दिरंगाई करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर आक्रमक शैलीत नाराजी व्यक्त केली होती. याच बैठकीत राज ठाकरे यांनी 'पिट्या भाई' फेम रमेश परदेशी यांना थेट विचारणा केली. त्यांनी प्रश्न केला, "तू छातीठोकपणे सांगतोस, संघाचा कार्यकर्ता आहेस, तर मग कशाला टाईमपास करतोस? एकाच ठिकाणी कुठे तरी राहा."
advertisement
राज ठाकरे यांनी परदेशी यांना एकाच वेळी दोन वेगवेगळ्या विचारधारेसोबत न राहण्याचा स्पष्ट सल्ला दिला. मनसेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याला राज ठाकरेंनी थेट सुनावल्यामुळे बैठकीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
'राष्ट्र प्रथम' म्हणत पकडली भाजपची वाट
राज ठाकरे यांनी खडसावल्यानंतर रमेश परदेशी यांनी तातडीने आपली भूमिका स्पष्ट केली. राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर परदेशी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशातील आपला एक जुना फोटो फेसबुकवर पोस्ट केला. या पोस्टमध्ये त्यांनी "मी माझ्या विचारांसोबत, राष्ट्र प्रथम" अशी टॅगलाइन वापरत, "जय हिंद, जय महाराष्ट्र" असे कॅप्शन दिले आणि अप्रत्यक्षपणे मनसे सोडल्याची अधिकृत घोषणा केली.
थोड्याच वेळात परदेशी यांनी थेट भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याचे जाहीर झाले. दरम्यान, परदेशी यांच्या या प्रवेशानंतर कलाक्षेत्रात तसेच राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.
