एका फ्रेंड रिक्वेस्टमुळे सुरू झाला छळ
बेंगळूरुमध्ये घडलेल्या या घटनेत पोलिसांनी नवीन के. मोन नावाच्या ४१ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. व्हाईटफिल्डचा रहिवासी असलेला हा व्यक्ती एका कन्सल्टन्सी सर्व्हिस फर्ममध्ये काम करतो. पोलिसांनी केलेल्या तपासणीत धक्कादायक बाब समोर आली आहे. या छळाची सुरुवात तेव्हा झाली, जेव्हा अभिनेत्रीने फेसबुकवर 'नवीनज्' नावाच्या या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केली.
advertisement
रिक्वेस्ट नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने लगेचच अभिनेत्रीला सातत्याने गलिच्छ मेसेज पाठवायला सुरुवात केली. समोरून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तो रोज वेगवेगळ्या अकाऊंट्सवरून तिला अश्लील व्हिडिओ आणि फोटो पाठवत होता.
धमक्या देऊनही थांबला नाही
अभिनेत्रीनेही हा सर्व त्रास शांतपणे सहन केला नाही. तिने या विकृत व्यक्तीला अनेकदा धमक्या दिल्या आणि त्याला ब्लॉक सुद्धा केले. पण आरोपी थांबला नाही. तो सतत बनावट प्रोफाईल्स तयार करायचा आणि तिचा पाठलाग सुरूच ठेवायचा. शेवटी, या छळाला कंटाळून अभिनेत्रीने त्याला धडा शिकवण्याचे ठरवले आणि तिने पोलिसांत तक्रार दाखल केली.
आरोपीने १ नोव्हेंबर रोजी नागरभावी परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये अभिनेत्रीला भेटायला बोलावले होते. अभिनेत्री तिथे पोहोचल्यावर तिने त्याला मैत्रीत रस नाही असे स्पष्ट सांगितले. यावर आरोपी भडकला आणि त्याने तिच्याशी असभ्य वर्तन केले.
पोलिसांनी केली तातडीने अटक
घडल्या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने रेस्टॉरंटमध्ये धाव घेत आरोपीला जागीच अटक केली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. अटकेच्या वेळी आरोपी स्वतःला दोन मोठ्या वृत्तपत्रांशी जोडलेला असल्याचे सांगत होता. दरम्यान, त्याच्या विरोधात बीएनएसच्या कलम ७५ (लैंगिक छळ), ७८ (पाठलाग करणे) आणि ७९ (स्त्रीच्या प्रतिष्ठेचा भंग करण्याचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायिक कोठडी देण्यात आली आहे.
