स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मधील अभिनेता कपिल होनराव याच्यासाठी सध्याचा काळ खूप खास आहे. कारण त्याला त्याचा आदर्श असलेल्या रितेश देशमुख याच्या महत्त्वाकांक्षी 'राजा शिवाजी' या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत कपिलने रितेशमुळेच आपण अभिनय क्षेत्रात आलो, हा किस्सा सांगितला होता आणि आता खुद्द रितेशने त्याच्या या चाहत्याचे भरभरून कौतुक केले आहे.
advertisement
रितेश देशमुखला बघून अभिनय सुरू केला - कपिल
कपिल होनरावने एका मुलाखतीत सांगितले होते की, २००३ मध्ये रितेश देशमुखचा 'तुझे मेरी कसम' हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता. "चित्रपटानंतर आमच्या गावात बाईक रॅली निघाली होती. तेव्हा लाल टी-शर्ट, जीन्स आणि गॉगल अशा कुल लूकमध्ये रितेशजी दिसले होते." रितेश देशमुखला पाहताच, "आपणसुद्धा अभिनेता बनलं पाहिजे," असा विचार पहिल्यांदा कपिलच्या मनात आला आणि तिथूनच त्याचा या क्षेत्रातील प्रवास सुरू झाला.
रितेशने बांधले कपिलच्या कौतुकाचे पुल
कपिल होनरावने रितेशचे आभार मानताना कमेंटमध्ये एक अत्यंत हृदयस्पर्शी गोष्ट सांगितली. तो म्हणाला, "२४ जानेवारी २०२५ हा दिवस मी कधीच विसरू शकत नाही. जे मी महाराष्ट्रातली सुपरहिट मालिका देऊनसुद्धा करू शकलो नाही, ते तुमच्या एका व्हिडीओ कॉलमुळे शक्य झालं." कपिल म्हणाला की, त्याच्या वडिलांना सतत एक काळजी होती की, अभिनय क्षेत्रात त्याचे कसे होणार? त्यांनी त्याला सरकारी नोकरी शोधण्याचा सल्ला दिला होता. पण रितेश देशमुखसोबतच्या व्हिडीओ कॉलनंतर त्यांची काळजी मिटली.
"आम्ही एकत्र काम करतोय हे वाक्य खूप मोठं आणि त्यांना समाधान देणारं होतं. आज त्यांच्या डोळ्यांत माझ्यासाठी प्रेम आणि अभिमान पाहून मला आणखी मेहनत करायला ऊर्जा मिळतेय," असे कपिल म्हणाला. कपिलचे वडील आठवड्यातून बरेचदा त्याला कॉल करतात आणि रितेशबद्दल आवर्जून विचारतात, कारण रितेश आणि त्याचे भाऊ यांच्यामध्ये त्यांना विलासराव देशमुख साहेबांची झलक दिसते. असे सांगत कपिलने लवकरच सेटवर भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये दिसणार मोठी फौज
राजा शिवाजी या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः रितेश करत असून मुख्य भूमिकेतही तोच दिसणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात रितेश देशमुखसोबत संजय दत्त, अभिषेक बच्चन, जिनिलिया देशमुख, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान आणि अमोल गुप्ते अशी बडी मंडळी पाहायला मिळणार आहेत.