समीर चौघुले बालपणी कसे होते?
अमित फाळके यांना दिलेल्या मुलाखतीत समीर चौघुलेंनी आपल्या बालपणाबद्दल सविस्तर भाष्य केलं आहे. समीर चौघुले म्हणाले,"बालपणी मी खूप खटपत्या होतो. गीता आणि रिता या दोन जुळ्या आतेंबहिणींसोबत माझं बालपण गेलं. मी एकूलता एक असलो तरी माझ्या या बहिणींसोबत मी खूप क्लोज होतो...अजूनही आहे. लहानपणी आम्हा तिघांचं एक खूप छान आयुष्य होतं. खेळात रमायला मला जास्त आवडायचं. लंगडी आणि कबड्डी मी खूप खेळायचो. खेळात असताना एक-दोनदा नाटकात काम केलं होतं. त्यावेळी नाटकात मी काही करू शकेल असं शिक्षकांना वाटलं नाही. एकंदरीतच स्पोर्ट्सची आवड निर्माण झाली होती. कबड्डीचा मी कॅप्टन होतो. झोनल लेव्हलपर्यंत आम्ही जिंकून वगैरे आलो होतो. कबड्डीमध्ये मी माझं करिअर करणार यावर मी ठाम होतो. पण त्यावेळी मला तशा संधी निर्माण झाल्या नाहीत. अॅथलेट, धावण्याच्या शर्यतेत मी सहभाग घ्यायचो".
advertisement
समीर चौघुले पुढे म्हणाले,"दहिसरच्या चाळीत माझं बालपण गेलंय. रस्त्यावर क्रिकेट खेळणं, मंदिराच्या आवाऱ्यात अभ्यास करणं यासर्व गोष्टी मी केल्या आहेत. दहिसरच्या शैंलेंद्र एज्युकेशन सोसायटी या शाळेत माझं शिक्षण झालंय. एकूलता एक असल्यामुळे आई-बाबांसोबत माझं एक वेगळं कनेक्शन होतं. आई-बाबांकडूनच माझ्याकडे विनोदाचा ह्युमर आला आहे. आई-बाबांना दोघांनाही नाटकाची आवड होती. माझे बाबा खूपच गंमतीशीर आहेत".
समीर चौघुलेंचं बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र महाविद्यालयात गेलं आहे. या कॉलेजमधील राऊत सरांनी त्यांना खऱ्या अर्थाने शिस्त लावली. मराठमोळं वातावरण असलेलं कॉलेज निवडावं यासाठी त्यांनी डहाणूकर कॉलेज निवडलं होतं. नोटिस बोर्डवर नाट्यमंडळाची लागलेली नोटीस पाहिली आणि सहज म्हणून ते त्याठिकाणी गेले. त्यानंतर विश्वास सोहनी यांची समीर चौघुलेंनी भेट घेतली. आणि त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं. विश्वास सोहनींमुळे समीर चौघुले यांना नाटकाची आवड निर्माण झाली. पुढे एकांकिका, मालिका, विनोदी कार्यक्रमांच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिले. समीर चौघुले यांचा 'गुलकंद' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा चित्रपट प्रेक्षकांच्या चागंलाच पसंतीस उतरला.