सोलापूरमधील तरुण जोडपं आकाश नारायणकर आणि अंजली शिंदे ही जोडी त्यांच्या मजेशीर रील व्हिडीओमुळे चर्चेत असते. त्यांच्या रील व्हिडीओने चाहत्यांची मनं जिंकली. या रील स्टार कपलची रिअल लाइफ स्टोरी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. 'लव्ह यू मुद्दू' असं त्यांच्या सिनेमाचं नाव आहे. हा सिनेमा 7 नोव्हेंबरला रिलीज झाला आहे. रेश्मा लिंगराजप्पा, सिद्दू मूलीमनी, तबला नानी हे कलाकार या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत.
advertisement
कोण आहे अंजली आणि आकाश ?
अंजली शिंदे आणि आकाश नारायणकर हे सोलापूरमधील कपल आहे. दोघांनी लग्न केलं पण लग्नाच्या काही महिन्यात त्यांच्या आयुष्यात मोठं वादळ आलं. अंजलीचा अपघात झाला आणि होत्याचं नव्हतं झालं. अपघातादरम्यान त्यांना कळलं की अंजलीला ब्रेन ट्युमर आहे. अंजलीची सर्जरी करण्यात आली आणि तिचे प्राण वाचले. पण तिची परिस्थिती पूर्वीसारखी राहिली नाही. तिच्या शरीराची उजवी बाजू पॅरलिसीस झाली. अशा परिस्थितीत आकाशने अंजलीचा हात न सोडता तो तिच्यासोबत खंबीरपणे उभा राहिला. आकाशच्या साथीने अंजली देखील रिकव्हर होत आहे. दोघेही मजेशीर रील बनवतात. त्यांच्या व्हिडीओमधून अनेकांना प्रेरणा मिळते. खरं प्रेम, प्रेमातील समर्पण काय असतं हे त्यांचे व्हिडीओ पाहिल्यानंतर कळतं. दोघे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत.
अशा या अंजली आणि आकाश यांची ही हृदयस्पर्शी कथा आता साऊथच्या 70 मिमी पडद्यावर दिसणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक कुमार यांना अंजली बाई आणि आकाश कथा भावली. त्यांनी त्यांच्या आयुष्यावर सिनेमा तयार करायचं ठरवलं. 'लव्ह यू मुद्दू' हा सिनेमा त्यांनी प्रेक्षकांसाठी आणला आहे.
अंजली आणि आकाश या सिनेमाच्या प्रीमियर गेले होते. आपली स्टोरी मोठ्या पडद्यावर पाहून दोघांनाही अश्रू अनावर झाले. थिएटरमध्ये त्यांना पाहून प्रेक्षकांनीही टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक केलं. आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसाची साथ कधीही सोडू नका असं दोघांनी म्हटलं. सोशल मीडियावरही अंजली बाई आणि आकाशचं कौतुक होत आहे.
