जितेंद्र जोशीचे शब्द अन् सोनू निगमची जादू
एखादं गाणं जेव्हा थेट काळजाला भिडतं, तेव्हा त्यामागे शब्दांची ताकद आणि स्वरांची जादू असते. ‘हास जराशी’ या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे गाणं सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी आपल्या मखमली आवाजात गायलं आहे. अभिनेता आणि कवी जितेंद्र जोशी यांनी या गाण्याचे शब्द अत्यंत संवेदनशीलपणे विणले असून, त्याला अद्वैत नेमळेकर यांनी साजेसं संगीत दिलं आहे. आई आणि मुलीच्या नात्यातील रुसवे-फुगवे, एकमेकींसाठी असलेलं न बोललेलं प्रेम आणि कठीण काळात एकमेकींचा होणारा आधार या गाण्यातून प्रवाहित होतो.
advertisement
तीन पिढ्यांचे भावनिक बंध
या गाण्याचं आणखी एक आकर्षण म्हणजे यात सिनेसृष्टीतील तीन कसलेल्या अभिनेत्री एकत्र दिसणार आहेत. भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे बायस या तिघींवर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. या तिघींच्या नात्यातील मैत्री, कधी होणारा संघर्ष आणि एकमेकींसाठी साठवलेली मूक वेदना या गाण्याच्या व्हिडिओमध्ये सुंदररित्या टिपली आहे. विशेषतः आई आणि मुलीच्या नात्याकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन हा चित्रपट देईल, असं या गाण्यावरून स्पष्ट होतंय.
चित्रपटाच्या दिग्दर्शिका जीजिविषा काळे या गाण्याबद्दल भरभरून बोलल्या. त्या म्हणतात, "‘हास जराशी’ हे गाणं म्हणजे केवळ साडेतीन मिनिटांची रचना नाही, तर तो या तिघींच्या नात्याचा हळवा श्वास आहे. आयुष्य घडवणारे जे छोटे-छोटे क्षण असतात, ज्यामध्ये आपण रडतो, हसतो आणि पुन्हा उभं राहतो, त्या क्षणांची ही गाथा आहे. प्रेक्षकांना स्वतःच्या घरातील नाती या गाण्यातून नक्कीच आठवतील."
६ मार्चला रिलीज होणार 'तिघी'
'सुप्री मीडिया' प्रस्तुत आणि 'कोक्लिको पिक्चर्स' निर्मित हा चित्रपट ६ मार्च रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे. निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे आणि नेहा पेंडसे बायस यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.
