'मुक्ताफळं उधळून सूनबाईंना वाचवायचंय'?
खासदार संजय राऊत यांच्या उपरोधिक टीकेनंतर, मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या किशोरी पेडणेकर यांनी थेट महेश कोठारे यांच्या कौटुंबिक अडचणींवर बोट ठेवत अत्यंत जहरी टीका केली आहे.
पेडणेकर यांनी कोठारे यांच्या भक्तीला त्यांच्या सूनबाई उर्मिला कोठारे यांच्या गाडीच्या अपघाताशी जोडले. पेडणेकर म्हणाल्या, "ते कलाकार आहेत हे मान्य, पण एका गंभीर अपघात प्रकरणात सूनबाई अडकल्या आहेत. त्यांना कायद्याच्या कचाट्यातून वाचवायचं असेल, तर अशा पद्धतीने मुक्ताफळं आणि भाजपची सुमनं उधळल्याशिवाय कामं होत नाहीत."
advertisement
उर्मिला कोठारेच्या कार अपघाताचा दाखला देत थेट आरोप
पेडणेकर यांनी २८ डिसेंबर २०२४ रोजी मध्यरात्री झालेल्या अपघाताचा स्पष्ट उल्लेख केला, ज्यात उर्मिला कोठारे यांच्या चालकाने मेट्रोचं काम करणाऱ्या दोन कामगारांना धडक दिली होती, ज्यात सम्राटदास जितेंद्रदास या कामगाराचा मृत्यू झाला होता, तर उर्मिलासह तिचा ड्राइव्हर गजानन पाल आणि कामगार सुजन रविदास जखमी झाले होते. कोठारे यांनी अचानक केलेली ही निष्ठा घोषणा म्हणजे राजकीय संरक्षण मिळवण्याचा प्रयत्न असल्याचा पेडणेकर यांचा थेट आरोप आहे.
किशोरी पेडणेकरांनी पुढे तीव्र शब्दात कोठारेंवर टीका केली. त्या म्हणाल्या, "मला कुठल्याही जातीचा अपमान करायचा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ज्या संस्कृतीने संपूर्ण महाराष्ट्रावर शौर्य दाखवलं, तिने शौर्याबरोबर क्रौर्यही दाखवलंय. मी एवढंच म्हणेन. वेळ येते तेव्हा कलाकारांना बाळासाहेब आणि उद्धवजी आठवतात. त्यांचा निषेध आहे.”
संजय राऊतांनीही घेतला महेश कोठारेंचा समाचार
याआधी, संजय राऊत यांनीही आपल्या खास शैलीत कोठारेंवर निशाणा साधला होता. राऊतांनी त्यांना 'तात्या विंचू' ची आठवण करून दिली. राऊत उपरोधिकपणे म्हणाले होते, "महेश कोठारे नक्की मराठीच आहेत ना? मला शंका येते. प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, पण तुम्ही असं काही बोलला असाल तर तुमच्या डोक्यात 'तात्या विंचू' शिरला आहे. तो रात्री येऊन तुमचा गळा दाबेल!"
कोठारेंसारख्या दिग्गज आणि लोकप्रिय कलाकाराने जाहीरपणे पक्षीय भूमिका घेतल्यामुळे, आता कला आणि राजकारण यांच्यातील सीमारेषा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.