"हिंदीमध्ये का? हा महाराष्ट्र आहे!"
नेहमीप्रमाणे आमिर खानने आज सकाळीच वांद्रे येथील केंद्रावर जाऊन आपलं कर्तव्य बजावलं. मतदान केंद्रावरची चोख व्यवस्था पाहून त्याने प्रशासनाचं कौतुक केलं आणि मुंबईकरांना घराबाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन केलं. विशेष म्हणजे, आमिरने माध्यमांशी संवाद साधताना मराठी भाषेचा वापर केला.
आमिर मराठीत बोलत असताना काही हिंदी वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी त्याला विनंती केली की, "आमिर सर, हा संदेश हिंदीत द्या ना!" त्यावर आमिरने क्षणभर थांबून जे उत्तर दिलं, ते ऐकून तिथले मराठी पत्रकारही थक्क झाले. आमिर आश्चर्याने म्हणाला, "हिंदीमध्ये कशाला? हा महाराष्ट्र आहे भाई!"
advertisement
आमिरच्या या उत्तराने सर्वच चाट पडले. मात्र, पत्रकारांनी जेव्हा त्याला सांगितलं की, "सर, हा व्हिडिओ दिल्लीतही दाखवला जाणार आहे," तेव्हा आमिरने हसून प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, "अच्छा, हे दिल्लीतही दिसणार आहे का? ठीक आहे..." त्यानंतर त्याने हिंदीतही आपला संदेश दिला. मात्र, पहिल्या फटक्यात त्याने ज्या ठामपणे मराठी भाषेचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा आदर राखला, त्याचं कौतुक सध्या सोशल मीडियावर केलं जातंय.
निवडणुकीत पेटलाय मराठीचा मुद्दा
आमिर खानचं हे विधान अशा वेळी आलंय जेव्हा मुंबईत भाषेवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी "हिंदी भाषिक व्यक्ती मुंबईचा महापौर बनेल" असं विधान केल्यापासून वादंग निर्माण झालं होतं. याच मुद्द्यावरून तब्बल दोन दशकांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र आले आहेत. अशा संवेदनशील वातावरणात एका बड्या हिंदी अभिनेत्याने "हा महाराष्ट्र आहे" असं ठणकावून सांगणं, हे राजकीयदृष्ट्याही खूप महत्त्वाचं मानलं जातंय.
प्रशासनाचं कौतुक आणि मतदारांना आवाहन
आमिरने केवळ भाषेवरच भाष्य केलं नाही, तर यंदा पालिकेने ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी केलेल्या विशेष व्यवस्थेचंही मनापासून कौतुक केलं. "मतदान प्रक्रिया खूप सुलभ आहे, गर्दी असूनही नियोजन उत्तम आहे, त्यामुळे प्रत्येकाने आपलं मत नोंदवायलाच हवं," असं तो शेवटी म्हणाला.
